अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या मार्केटयार्ड येथील शाखेत असलेल्या व काही वर्षे वापरात नसलेल्या बचत खात्यातील 23 हजार रुपय
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या मार्केटयार्ड येथील शाखेत असलेल्या व काही वर्षे वापरात नसलेल्या बचत खात्यातील 23 हजार रुपये परस्पर काढून या रकमेचा अपहार व चोरी केली. तसेच खातेदाराच्या संमतीशिवाय परस्पर चेक बुक अदा करून खातेदाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. विविध चौकशा व गुन्हे दाखल झाल्याने आधीच गाजत असलेल्या नगर अर्बन बँकेतील हा नवा प्रतापही चर्चेचा झाला आहे.
नगर अर्बन बँकेतील चुकीचे कर्ज वाटप व आर्थिक गैरव्यवहारांची प्रकरणे गाजत आहेत. पिंपरी चिंचवड येथील चुकीचे 22 कोटीचे कर्ज वाटप घोटाळा, नगरच्या मुख्यालयातील 3 कोटीचा चिल्लर घोटाळा, शेवगाव शाखेतील 5 कोटीचा बनावट सोने तारण घोटाळा व नुकताच काही दिवसांपूर्वी दाखल झालेला 28 कर्ज ख़ात्यांद्वारे झालेला 150 कोटीचा आर्थिक घोटाळा प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल असून, यात बँकेचे संचालक व अधिकारी-कर्मचारी आरोपी आहेत. याशिवाय बँकेच्या सस्पेन्स खात्यातून परस्पर खासगी व्यक्तींचे कर्ज हप्ते भरले गेल्याचाही स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. या सर्व प्रकरणांपैकी काहींची पोलिस चौकशी सुरू आहे तर काहींची न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. यामुळे बँकेचे नाव सतत प्रसिद्धी माध्यमांतून झळकत असते. या पार्श्वभूमीवर आता नव्याने बँकेतील खात्याचा परस्पर गैरवापर करण्याची घटना उघड झाल्याने बँकेच्या खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. वापरात नसलेल्या अशा आणखी काही खात्यांतूनही असेच पैसे परस्पर काढून घेण्याचे प्रकार तर घडले नसतील ना, याची भीतीही व्यक्त होत आहे.
40 वर्षांपासूनचे खाते
एमएसईबीचे निवृत्त अधिकारी कनकमल चांदमल गुगळे यांनी त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेतल्याची ही तक्रार केली आहे. 27 जुलै 2021 रोजी ही घटना घडली आहे. गुगळे यांचे नगर अर्बन बँकेच्या मार्केटयार्ड शाखेत गेल्या 40 वर्षापासून बचत खाते आहे. आजारपणामुळे ते सन 2017 नंतर बँकेत कधीही गेले नव्हते. बँकेने त्यांना अदा केलेल्या चेक बुकमधील एकच चेक वटलेला आहे. बाकी संपूर्ण चेक बुक त्यांच्याकडे आहे. 17 मार्च 2017 रोजी बँक खात्यामध्ये 21 हजार 924 रुपये शिल्लक होते. त्यानंतर डिव्हीडंड व व्याजाच्या काही रकमा जमा झाल्या. अज्ञात व्यक्तीने वापरात नसलेल्या या बँक खात्याचा गैरवापर करुन बंद पडलेले खाते चालू करण्यासाठी 23 जुलै 2021 रोजी 100 रुपये भरुन चेक मिळण्यासाठी बँकेकडे अर्ज केला. तो अर्ज मंजूर होऊन या अज्ञात व्यक्तीने गुगळे यांच्या सहीविना व संमतीविना खात्यातून 23 हजार रुपये 27 जुलै 2021 रोजी काढून घेतले. ही रक्कम आर. सी. करमुंदाळे यांच्या नावे काढण्यात आल्याचे गुगळे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
तीन महिन्यांनी तक्रार दाखल
आपल्या खात्यातून पैसे काढले गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर गुगळे यांनी पोलिसात धाव घेतली. मात्र, सुरुवातीला त्यांची फिर्याद न घेता त्यांना सायबर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. तेथेही त्यांची तक्रार न घेतल्याने त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे मार्च 2022 मध्ये अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोतवाली पोलिसात हजर होऊन गुगळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्याचे काम पोलिसांचे सुरू होते.
COMMENTS