अहमदनगर/प्रतिनिधी : कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना घसरलेले कांद्याचे दर सावरण्यासाठी नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करावी अशी मागणी स्वतंत्र
अहमदनगर/प्रतिनिधी : कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना घसरलेले कांद्याचे दर सावरण्यासाठी नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करावी अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी शासनाकडे केली होती. तिची दखल घेऊन दि. 19 एप्रीलपासून महाराष्ट्रात नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली असल्याचे घनवट यांनी सांगितले. स्वतंत्र भारत पार्टीच्या मागणीची दखल घेऊन तातडीने कांदा खरेदी सुरु करण्याची कार्यवाही केल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार व राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांचे आभार मानत आहोत, असेही घनवट यांनी आवर्जून स्पष्ट केले.
नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु झाली असून स्वतंत्र भारत पार्टीच्या प्रयत्नांना यश आल्याचे स्पष्ट करून घनवट म्हणाले, महाराष्ट्रात या वर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे व त्यामुळे विक्रमी उत्पादनही अपेक्षित आहे. मात्र, यामुळे कांद्याचे दर कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वतंत्र भारत पार्टीने राष्ट्रवादी पार्टीचे नेते शरद पवार व भारताचे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर व महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते. मूल्य स्थिरीकरण निधी अंतर्गत किमान 15/- रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत शासनाने 2 लाख 20 हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पूर्वी 1 लाख 70 हजार टन कांदा खरेदी करण्यात आला होता, त्या तुलनेत 50 हजार टन कांदा जास्त खरेदी करण्यात येणार आहे. सध्याच्या प्रचलित बाजारभावाप्रमाणेच कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडद्वारे घेण्यात आला आहे. मात्र, कांदा खरेदीचा निर्णय झाल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील 20 शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा खरेदी व साठवणुकीची जवाबदारी देण्यात आली आहे. मागील कांदा खरेदीच्या वेळेस बराच आर्थिक गैरप्रकार झाला असल्याचे समोर आले आहे. या वेळेस स्वतंत्र भारत पार्टीचे व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहेत. शासनाने शेतकर्यांसाठी उपलब्ध केलेल्या पैशाचा उपयोग शेतकर्यांच्या फायद्यासाठीच झाला पाहिजे हा हेतू यामागे आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
COMMENTS