अहमदनगर/प्रतिनिधी : मागील 28 वर्षांपासून जप्त मुद्देमाल म्हणून जपून ठेवलेला सुमारे एक टन वजनाचा गांजा (अंमली पदार्थ) नगरच्या पोलिसांनी अखेर नष्ट केला
अहमदनगर/प्रतिनिधी : मागील 28 वर्षांपासून जप्त मुद्देमाल म्हणून जपून ठेवलेला सुमारे एक टन वजनाचा गांजा (अंमली पदार्थ) नगरच्या पोलिसांनी अखेर नष्ट केला. रांजणगाव येथील कंपनीत नेऊन तेथे या गांजाची विल्हेवाट लावली गेली. न्यायालयाच्या परवानगीनंतर हा गांजा नष्ट करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी स्वतः उपस्थित राहून गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया योग्यरितीने होते की नाही, याची दक्षता घेतली.
अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अन्वये नगर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये सन 1994 ते 2014 पर्यंत दाखल 32 गुन्ह्यात एकूण 997 किलो 274 ग्रॅम गांजा व अफू जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर न्यायालयाने मुद्देमाल नष्ट करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यात विविध पोलिस ठाणी व एलसीबीच्या पथकांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेला व 28 वर्षापासून प्रलंबित असलेला सुमारे 1 टन गांजा नष्ट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. शनिवारी (दि.26) रांजणगाव एमआयडीसी येथील कंपनीत हा गांजा नष्ट करण्यात आला आहे. पोलिस महासंचालकांच्या आदेशान्वये पोलिस अधीक्षक पाटील यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलिस उपअधीक्षक (गृह) मेघश्याम डांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार सहायक फौजदार विष्णु घोडेचोर, हेडकॉन्स्टेबल भाऊसाहेब कुरुंद, सखाराम मोटे, शरद बुधवंत, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक शंकर चौधरी, कॉन्स्टेबल जयराम जंगले तसेच चालक हेड कॉन्स्टेबल अर्जुन बडे व बबन बेरड यांनी प्रदीर्घ काळापासून जप्त असलेला हा ग्रॅम नष्ट करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
COMMENTS