वाईनविरोधात अण्णांनी पुकारला अखेर एल्गार ; 14 फेब्रुवारीपासून उपोषण इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाईनविरोधात अण्णांनी पुकारला अखेर एल्गार ; 14 फेब्रुवारीपासून उपोषण इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्री निर्णयाच्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी एल्गार पुकारला आहे. सरकारने येत

Sangamner : कोरोना लसीकरणाबाबत प्रबोधनात्मक जनजागृती | LokNews24
सात मल्टीनिधी संस्थांनी गुंतवणूकदारांना फसवले…
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागावर पाणी टंचाईचे सावट

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्री निर्णयाच्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी एल्गार पुकारला आहे. सरकारने येत्या चार-पाच दिवसात वाईन विक्रीचा निर्णय मागे घेतला नाही तर 14 फेब्रुवारीपासून राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथील यादवबाबा मंदिरात उपोषण सुरू करण्याचा इशारा हजारेंनी दिला आहे.
हजारे यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक स्मरणपत्र दिले आहे. राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात 14 पासून आमरण उपोषण करणार असल्याचे यात स्पष्ट केले गेले आहे. गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. तसेच राज्यातील विविध बिगर राजकीय, सामाजिक संघटना आमच्याकडे येत आहेत व चर्चा करीत आहेत. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही, असे यात त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुर्दैवी युक्तिवाद
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले, तरुण व्यसनाधीन होऊ शकतात, महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटते. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणार्‍या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. शिवाय, वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे, हेही आश्‍वचर्यकारक आहे, असे स्पष्ट करून पुढे म्हटले आहे की, राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना पाहता वाईन विक्रीचा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर आंदोलन करावेच लागेल या निर्णयावर आम्ही आलो आहोत. लवकरच राज्यातील विविध सामाजिक संघटनांच्या समविचारी कार्यकर्त्यांची एक बैठक राळेगणसिद्धी येथे घेण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा, मला 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करावे लागेल, असे नमूद केले आहे. लहान बालक ही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे. या बालकांमध्ये उद्याचे महापुरूष आहेत. सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन ठेवली तर ही बालकेसुद्धा व्यसनाधीन होतील आणि ते अधोगतीकडे जातील. आमच्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधू संतांनी, राष्ट्रीय महापुरुषांनी अतोनात प्रयत्न करून संस्कृती जतन करून ती वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानामध्ये वाईन आली तर ही आमची संस्कृती धुळीला मिळेल आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल. त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही. ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून 14 फेब्रुवारी 2022 रोजी मी राळेगणसिद्धीमध्ये श्रीसंत यादवबाबा मंदिरात उपोषण करीत आहे, असेही यात म्हटले आहे.

उद्धवजी…तुम्हीसुद्धा?
यापूर्वी आपणास या विषयावर दोन पत्रे पाठविली आहेत तसेच लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकाही टाळण्यात येत आहेत. त्यासंबंधीही काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे. आपणाकडून एकाही पत्राचे उत्तर आलेले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या एकाही पत्राला कधीच उत्तर देत नाहीत. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडूनही तसेच घडताना दिसत आहे. मी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना कधीही वैयक्तिक विषयावर पत्र लिहिलेले नाही. व्यापक हिताच्या सामाजिक प्रश्‍नांवरच मी पत्र लिहित असतो. तरीही त्याचे उत्तर देणे टाळले जात असेल तर सरकारला जनतेच्या हिताशी काही देणे-घेणे आहे की नाही? असा प्रश्‍न उभा राहतो, असा उद्वेगही अण्णांनी या स्मरणपत्रात व्यक्त केला आहे.

COMMENTS