बेलवाडी : विक्रमी उसाचे उत्पन्न घेतलेले शेतकरी प्रमोद गायकवाड ऊस दाखविताना समवेत कृषी सल्लागार सागर घाडगे, शिरोळ इचलकरंजी मतदार संघाचे शिवसेना पक्षनि
मसूर / वार्ताहर : ऊस शेतीतील अभ्यास, खत व पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि कृषी सल्लागार यांचे मार्गदर्शनाच्या जोरावर जय हनुमान करियर अॅकॅडमी बेलवाडी, ता. कराड या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी एकरी 125 टनाचे विक्रमी उत्पादन घेतल्याने पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे.
प्रमोद गायकवाड हे अॅकॅडमीच्या माध्यमातून मुले सैन्य दलात भरती करतात. पण यातून मिळालेल्या फावल्या वेळेचा छंद म्हणून त्यांनी शेती करण्याचा पिंड जोपासला आहे. त्यात ते यशस्वी झाले आहेत. आपल्या विक्रमी उत्पादनाबाबत बोलताना ते म्हणाले, गेल्या काही वर्षापासून आपण शेतीत नवनवीन प्रयोग राबवत आलो. त्यात मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर प्रथमच एवढे मोठे उत्पादन घेण्यास यशस्वी ठरलो. ते म्हणाले, 84 गुंठे क्षेत्रात साडेचार फुटाची सरी सोडली. लागणीनंतर कोंब फुटल्यावर साधारण दोन महिन्यांनी चमच्याने खत घालून ते खोर्याने मुजविले. त्यानंतर तीन फूट वाढ झाल्यावर पुन्हा खताचा छोटा डोस देऊन खोर्याने मुजविले. ऊस चार फुटाच्या वर गेल्यावर सिंगल रोटावेटर मारला. त्यानंतर पाच ते साडेपाच फूट उंचावर गेल्यावर खताचा मोठा डोस देऊन डबल रोटावेटर मारला. साखळी पध्दतीने आरफळ कालव्याच्या पाट-पाण्यावर पाण्याचे नियोजन केले. यासाठी आपणास हर्षवर्धन कृषीसेवा केंद्राचे संचालक सागर घाडगे (कांबिरवाडी) व बेलवाडीचे प्रगतशील शेतकरी नवनाथ बोबडे यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या जयवंत शुगर धावरवाडी या कारखान्याच्या ऊस तोडणी यंत्रणेकडून ऊसतोड सुरू आहे. 55 ते 60 कांड्यांचा ऊस तोडताना मजुरांची तारांबळ उडत आहे. दरम्यान, जयवंत शुगरच्या शेती अधिकार्यांनी त्यांच्या प्लॉटला भेट देऊन पाहणी केली.
कारखान्याची ऊसतोड चालू झाली त्यावेळी ऊसतोड मिळाली असती आणि ऊसाला तुरा फुटला नसता तर गुंठ्याला साडेतीन टन अॅव्हरेज मिळाले असते. – संतोष झांजुर्णे (ऊसतोड मुकादम, बीड.)
COMMENTS