नगर अर्बन वाचवण्यासाठी भाजप सरसावले ; सत्ताधार्‍यांचे खा. विखेंनंतर मंत्री कराडांना साकडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन वाचवण्यासाठी भाजप सरसावले ; सत्ताधार्‍यांचे खा. विखेंनंतर मंत्री कराडांना साकडे

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्याने त्यातून बँकेला बाहेर काढून वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सरसावला आहे. बँ

नगर अर्बन बँकेला चुकते करावे लागणार डिपॉझीट गॅरंटीचे पैसे
बँक बचावची आश्‍चर्यकारक माघार, सहकार वर्चस्वाच्या दिशेने…
नगर अर्बन बँकेची अखेर निवडणूक होणार ; चिन्ह वाटप जाहीर, बँक बचाव पॅनेलचा बिनविरोध सूर बासनात

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्याने त्यातून बँकेला बाहेर काढून वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सरसावला आहे. बँकेचे विद्यमान सत्ताधारी सहकार मंडळाने आधी नगरचे भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांना साकडे घातले आहे व आता थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना भेटून बँकेवरील निर्बंध हटवण्यासाठी मदत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भेटलेल्या या शिष्टमंडळाला आश्‍वासन देताना, अर्बन बँकेवरील निर्बंध हटण्यासाठी रिझर्व बँक व अर्थमंत्री कडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली.
नगर अर्बन बँकेची नुकतीच निवडणूक होऊन माजी अध्यक्ष व माजी खा. (स्व.) दिलीप गांधी यांना मानणार्‍या सहकार मंडळाची सत्ता आली आहे. मात्र, ही सत्ता आल्यानंतर अवघ्या पाच दिवसात रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेच्या कामकाजावर बंधने टाकली आहेत. ठेवीदार व खातेदारांना 10 हजारापेक्षा जास्त रक्कम देता येणार नाही, नवे कर्ज वितरण करता येणार नाही, नव्या ठेवी घेता येणार नाही, जुने-नवे कर्ज प्रकरण करता येणार नाही, अशा स्वरुपाच्या निर्बंधांमुळे सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आता केंद्रातील सत्तेत असलेल्या भाजप नेत्यांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

डॉ. कराड यांची घेतली भेट
नगर अर्बन बँकेच्या व्यवहारावर रिझर्व बँकेने निर्बंध आणल्यावर बँकेच्या संचालक मंडळाने निर्बंध उठण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शुक्रवारी सकाळी बँकेचे संचालक व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली सत्तधारी गटाचे नेते सुवेंद्र गांधी यांनी नवी दिल्लीत केद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची भेट घेऊन अर्बन बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधांची माहिती देवून, हे अन्यायकारक निर्बंध त्वरित शिथिल करावेत व अर्बन बँकेचे सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत करावेत, अशी विनंती करणारे निवेदन त्यांना दिले. यावेळी संचालक राहुल जामगावकर व अ‍ॅड.राहुल जामदार उपस्थित होते. यावेळी मंत्री डॉ. कराड यांनी शिष्टमंडळास आश्‍वासन दिले व अर्बन बँकेवरील निर्बंध हटण्यासाठी रिझर्व बँक व अर्थ मंत्र्यांकडे पाठपुरावा करून सर्व प्रकारचे सहकार्य करू, असे सांगितले.

खा. डॉ. विखेंचेही आश्‍वासन
अर्बन बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी आरबीआय व अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन नुकतेच खा. डॉ. सुजय विखे यांनीही बँकेच्या सत्ताधार्‍यांना दिले आहे. आरबीआयने अर्बन बँकेवर निर्बंध लादले असले, तरी बँक वाचली पाहिजे, अशी भूमिका घेत अर्बन बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी खासदार या नात्याने केंद्रीय अर्थमंत्री व आरबीआयकडे पाठपुरावा करणार आहे. माझ्या यशात स्व. दिलीप गांधी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याची परतफेड करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे अर्बन बँकेला पूर्ण सहकार्य करू, असे आश्‍वासन खा. डॉ. विखे यांनी दिले.
बँकेच्या नव्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यासाठी खा. डॉ. विखेंनी नुकतीच बँकेस भेट दिली व चेअरमन राजेंद्र अग्रवाल आणि व्हा. चेअरमन दीप्ती गांधी यांचा सत्कार केला. यावेळी सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ संचालक अशोक कटारिया, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, अजय बोरा, मनेष साठे, कमलेश गांधी, ईश्‍वर बोरा, राहुल जामगावकर, संपतलाल बोरा, गिरीश लाहोटी, बँकेचे मुख्य व्यवस्थापक सतीश रोकडे, प्रमुख व्यवस्थापक एम. पी. साळवे, वरिष्ठ अधिकारी सुनील काळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव उपस्थित होते. बँकेचे कामकाज सुरळीत सुरू झाले असताना, अचानकपणे बँकेवर निर्बंध येणे ही दुर्दैवी बाब आहे. पण मला विश्‍वास आहे की अर्बन बँक पुन्हा सुस्थितीत येईल. बँकेला म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, यासाठी लवकरात लवकर आरबीआयच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन अर्बन बँकेची बाजू मांडणार आहे, अशी ग्वाही खा. विखे यांनी दिली.
प्रशासक असतानाही आम्ही वसुलीसाठी प्रयत्न केला. बँकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर बँकेच्या ठेवी वाढवण्यास सुरुवात केली होती. अर्बन बँकेचा वाढलेला एनपीए कमी करण्यासाठी थकित कर्जवसुलीचे नियोजन बँकेच्या नूतन संचालक मंडळाने केले आहे. यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार काम सुरु केले होते. त्यामुळे बँकेवर लादलेला निर्बंधांचा अन्याय दूर व्हावा, यासाठी खा. विखे यांनी सहकार्य करावे, अशी मागणी यावेळी सुवेंद्र गांधींनी केली. चेअरमन अग्रवाल म्हणाले की, अर्बन बँकेवर प्रशासक असतानाही निर्बंध होते. मात्र, त्यावेळी खात्यातून पैसे काढण्याचे निर्बंध नव्हते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँकेवर लादलेले निर्बंध अन्यायकारक आहेत. आरबीआयने आमचे म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक होते. बँकेवरील निर्बंध मागे घेतले जावेत, यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे, असे ते म्हणाले. यासाठी सहकार्याची ग्वाही डॉ. विखे यांनी दिली.

मनपा कामगार संघटना आवाहन
नगर अर्बन बँकेत खाते असलेल्या मनपाच्या कर्मचार्‍यांना मनपा कामगार संघटनेने आवाहन केले असून, अन्य बँकांतून खाते उघडण्याचे सांगितले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी नगर अर्बन बँकेमधून रक्कम काढण्यास निर्बंध घातलेले असून खातेदार यास फक्त 10,000/- इतकीच रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे अहमदनगर महापालिकेमधील ज्या कर्मचार्‍यांचे नगर अर्बन बँक येथे पगाराचे खाते असेल, त्या कर्मचार्‍यांना पूर्ण पगार काढता येणार नाही. त्यामुळे कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंद वायकर यांनी आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. चर्चेअंती अर्बन बँकेमध्ये पगाराचे खाते असलेल्या सर्व कामगार-कर्मचार्‍यांना वैयक्तिक धनादेश (चेक) देण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या कर्मचार्‍यांचे अर्बन बँक येथे पगाराचे खाते असेल, अशा कर्मचार्‍यांनी इतर बँकेत तातडीने खाते उघडावे व धनादेश जमा करून रक्कम काढावी. धनादेशाबाबत कामगार युनियन मार्फत लवकरच कळविण्यात येईल तसेच नगर अर्बन बँक येथे कोणतेही व्यवहार करू नये, असे आवाहन कामगार संघटनेने केले आहे.

COMMENTS