सातारा / प्रतिनिधी : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली आह
सातारा / प्रतिनिधी : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली आहे. त्यामुळे भारतातील जनतेची त्यांच्याकडून पिळवणूक झाली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्याचा दावा करताना जगात आपला क्रमांक 144 वा असून 143 देशांनी आपल्यापेक्षा चांगले काम केले आहे, हे मोदी सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यावे, असा टोला त्यांनी लगावला.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना महामारी, इंधन दरवाढ, लॉकडाऊन, महागाई या विषयांवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. चव्हाण म्हणाले, भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याचा दावा मोदींनी केला आहे. मात्र, जगात आपला क्रमांक 144 वा आहे. याचा अर्थ 143 देशांनी आपल्यापेक्षा लसीकरणात चांगले काम केले आहे. मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर लोक नाराज असून आता लोक बोलू लागले आहेत. गेल्या सात वर्षांत त्यांनी पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढ करून लोकांच्या, गोरगरिबांच्या खिशातून 23 लाख कोटी गोळा केले आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल आल्यानंतर मोदी सरकार पॅनिक झाले. त्यानंतर इंधन दरवाढ थोडी कमी केली. मोदी सरकार लसोत्सव साजरा करत असून प्रमाणपत्रावरही ते स्वत:चा फोटो छापत आहे. त्यांना स्वत:चा फोटी छापण्याची फार घाई आहे, कारण लोक त्यांना विसरतील, अशी भीती आहे.
महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होत आली असून सरकार पडावे म्हणून भाजपने अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यास यश आले नाही, असे सांगून चव्हाण म्हणाले, तीन पक्षांच्या सरकारला दोन महिने झाले की पडेल, वर्षांनंतर पडेल, आज पडेल, उद्या पडेल, अशी वल्गना भाजपकडून केली जात होती. सरकार टिकणार नाही, असाही दावा होत होता. मात्र, आता त्यांनी आमचा नाद सोडून दिला आहे. कारण सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे.
COMMENTS