अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या मतदार यादीसंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अवघ्या तीन हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरक
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या मतदार यादीसंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अवघ्या तीन हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकतींसाठी सोमवारी शेवटची मुदत होती. या हरकतींवर बुधवारी (20 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे व 26 ऑक्टोबरपासून उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून बैठकांवर बैठका सुरू झाल्या असून निवडणुकीतील रणनीतीसंदर्भात खलबते होत आहेत. अनेकविध चर्चाही रंगात आहेत. संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी दि.28 नोव्हेंबरला मतदान होणार असून दि.30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. संचालक मंडळाची निवडणूक तब्बल सात वर्षांनी होत आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी असलेले जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी प्रारूप मतदारयादी प्रसिध्द केली. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत हरकतींसाठी मुदत देण्यात आली होती. रविवारपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तीन हरकती प्राप्त झाल्या असून शाखा व नावात बदल अशा किरकोळ स्वरूपाच्या या हरकती आहेत. 1 हजाराचे शेअर्स असणार्याना मतदानाचा अधिकार असून 55 हजार 991 मतदार संख्या असलेली मतदार यादी प्रसिध्द झालेली आहे. बँकेतील गैरव्यवहारामुळे ही बँक चर्चेचा विषय राहिली आहे. बँकेतील गैरव्यवहाराबाबत पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये निवडणूक अपेक्षीत होती. मात्र, बँकेचा एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेवर सुमारे दोन वर्षापासून प्रशासक राज सुरू आहे. उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी दि.26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत मुदत आहे. बँकेच्या संचालक मंडळाची यापूर्वी 2014 मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत माजी खा. (स्व.) दिलीप गांधी व (स्व.) सुवालाल गुंदेचा यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल तसेच सुभाष भंडारी व राजेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनल यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत गांधी व गुंदेचा यांच्या पॅनलने बँकेवर एकहाती सत्ता मिळविली होती. या पार्श्वभूमीवर आता होऊ घातलेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व कोण करणार तसेच विद्यमान संचालकांपैकी पुन्हा कोण निवडणूक रिंगणात उतरणार, याकडे लक्ष लागले आहे.
COMMENTS