शाहूवाडी (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांच्या हत्या प्रकरणात एक अ

शाहूवाडी (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांच्या हत्या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक वळण समोर आले आहे. सुरेखा न्यारे यांचा खून अनैतिक संबंधातून नव्हे, तर आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मदत म्हणून दिलेले ८ तोळे दागिने आणि ३ लाख रुपये परत मागितल्यानेच सुरेखा यांची हत्या करण्यात आल्याचा दावा न्यारे कुटुंबीयांनी केल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू पाटील (वय ४०, रा. शिरगाव) याला आधीच अटक केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी प्रकाश पाटील याने सुरेखा न्यारे यांना “आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊया” असे सांगून स्वतःच्या चारचाकी गाडीत बसवले. त्यानंतर गावाबाहेर असलेल्या स्वतःच्या जनावरांच्या गोठ्यात जाऊन वैरण घालून पुढे निघूया असा बहाणा करत तो त्यांना गोठ्याकडे घेऊन गेला. तेथे संधी साधून त्याने सुरेखा यांचा गळा आवळून निर्घृण खून केला.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडी गाठले
हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी प्रकाशने सुरेखा यांचा मृतदेह स्वतःच्याच गाडीत टाकला आणि तो भिवंडीच्या दिशेने निघाला. प्रवासादरम्यान त्याने आपल्या भाच्याला (संदेश मोरे) या कृत्याची माहिती दिली आणि मृतदेह समुद्रात फेकण्यासाठी मदत मागितली. मात्र, भाच्याने मदत न करता तातडीने भिवंडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. भिवंडी पोलिसांनी तत्परता दाखवत गाडी अडवून आरोपी प्रकाश पाटील याला बेड्या ठोकल्या आणि मृतदेह ताब्यात घेतला.
प्रारंभी हे प्रकरण अनैतिक संबंध आणि लग्नाच्या तगाद्यातून घडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता नातेवाईकांनी दिलेल्या ८ तोळे दागिन्यांच्या आणि ३ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहाराच्या दाव्यामुळे पोलीस या दृष्टीनेही सखोल तपास करत आहेत.

COMMENTS