नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवरील व्हिडिओ हटविला होता. त्यानंतर पुन्हा तो पूर्ववत करण्यात आला. याप्रकरणी मेटा कंपनीकडून माफी म

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवरील व्हिडिओ हटविला होता. त्यानंतर पुन्हा तो पूर्ववत करण्यात आला. याप्रकरणी मेटा कंपनीकडून माफी मागण्यात आली आहे. कंपनीने हा संदेश कोणत्याही नियमभंगामुळे हटवण्यात आलेला नसून तांत्रिक बिघाडामुळे तो चुकून अनुपलब्ध झाल्याचा दावा केला आहे. तसेच त्रुटी लक्षात येताच संबंधित संदेश पूर्ववत करून पुन्हा सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेनंतर केंद्र सरकारने संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पंतप्रधानांच्या अधिकृत संदेशाबाबत अशी परिस्थिती कशी निर्माण झाली, याची माहिती संबंधित विभागांकडून घेतली जात आहे. कंपनीने दिलेले तांत्रिक कारण वस्तुस्थितीशी सुसंगत आहे का, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना स्पष्टीकरणासाठी बोलावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संदेश हटविण्यामागील नेमके कारण, तांत्रिक प्रक्रियेमध्ये नेमकी कोणती त्रुटी निर्माण झाली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार आहे, याबाबत सरकारकडून सविस्तर माहिती मागवली जाऊ शकते. कंपनीच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, संबंधित दृकश्राव्य संदेश चुकून हटविण्यात आल्याची कबुली देण्यात आली आहे. ही घटना कंपनीच्या धोरणाशी संबंधित नसून तांत्रिक प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकीमुळे घडल्याचे सांगण्यात आले आहे. त्रुटीची माहिती मिळताच संदेश तातडीने पूर्ववत करण्यात आला असून, या प्रकाराबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला आहे. काही काळासाठी हा संदेश भारतातील वापरकर्त्यांना दिसत नव्हता. त्यामुळे अनेकांनी याबाबत समाजमाध्यमांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर कंपनीने आवश्यक दुरुस्ती करत संबंधित संदेश पुन्हा उपलब्ध करून दिला.

COMMENTS