मुंबई : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’ अंतर्गत दुसरी लाभार्थी यादी लवकरच जाहीर होणार असून, या टप्प्यात सुमारे 16
मुंबई : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’ अंतर्गत दुसरी लाभार्थी यादी लवकरच जाहीर होणार असून, या टप्प्यात सुमारे 16 लाख 95 हजार शेतकर्यांचा समावेश असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी दिली. कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात असून, पात्र शेतकर्यांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्रि भरणे यांनी सांगितले की, ही योजना एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात काही पात्र शेतकर्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसर्या टप्प्यात मोठ्या संख्येने शेतकर्यांना लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या अटी पूर्ण करणे आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकर्यांची नावे यादीत समाविष्ट केली जातील आणि त्यांना लाभ दिला जाईल, असे भरणे यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या यादीत नाव नसल्यामुळे लाभ मिळणार नाही, असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. पात्रता पूर्ण करणार्या सर्व शेतकर्यांना टप्प्याटप्प्याने योजनेचा लाभ दिला जाईल. दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत सुमारे 56 लाख शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पहिल्या किंवा दुसर्या यादीत नाव नसले तरी पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुढील यादीत नाव समाविष्ट होऊ शकते. त्यामुळे शेतकर्यांनी संयम बाळगावा, असे त्यांनी आवाहन केले. या योजनेसाठी सुमारे 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पात्र शेतकर्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. अर्ज किंवा कागदपत्रांबाबत काही तक्रारी अथवा त्रुटी असल्यास त्यांचे निराकरण करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हवामानाचा अंदाज घेऊनच शेतकर्यांकडून पेरणी करावी
राज्यातील खरीप हंगामाबाबत माहिती देताना भरणे म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी, तर ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी पेरणी झाली आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी पेरणी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची शासनाने दखल घेतली असून, बाधित शेतकरी आणि नागरिकांना नियमानुसार मदत दिली जाईल. राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

COMMENTS