पिंपळनेर: बीड तालुक्यातील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या मैंदा पोखरी येथील प्रसिद्ध थोरले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थान येथे आषाढी एका

पिंपळनेर: बीड तालुक्यातील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या मैंदा पोखरी येथील प्रसिद्ध थोरले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थान येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली. जिल्ह्यासह विविध भागांतून आलेल्या वारकर्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी माथा टेकवत भक्तिभावाने दर्शन घेतले. दिवसभर मंदिर परिसर ‘विठ्ठल विठ्ठल’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या अखंड गजराने दुमदुमून गेला.
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर मंदिराचे मठाधिपती ह.भ.प. गोपाळ महाराज शास्त्री व पुजारी विश्वनाथ गुरु महाराज यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शास्त्रोक्त महापूजा संपन्न झाली. महापूजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. मैंदा पोखरी येथील हे मंदिर सन १७५९ मध्ये स्थापन झाले असून, गेल्या अडीचशे वर्षांहून अधिक काळापासून येथे आषाढी एकादशीचा सोहळा अखंड भक्तिभावाने साजरा केला जात आहे. त्यामुळे या मंदिराला बीड जिल्ह्यात ‘थोरली पंढरी’ म्हणून विशेष मान्यता आणि श्रद्धास्थान लाभले आहे.
या सोहळ्यासाठी बीड, वडवणी, धारूर, माजलगाव आदी तालुक्यांसह पिंपळनेर, घाटसावळी, आंबेसावळी, जरुड, नाळवंडी, जवळा, केसापुरी, ताडसोन्ना, ढोरवाडी तसेच परभणी परिसरातून टाळ-मृदंगाच्या गजरात अनेक दिंड्या मंदिरात दाखल झाल्या. पिंपळनेर येथील महिलांची दिंडीही विशेष आकर्षण ठरली. भाविकांसाठी दिवसभर साबुदाणा खिचडीच्या फराळाचे मोफत वाटप करण्यात आले. मंदिर संस्थान, ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि प्रशासन यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण सोहळा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.

COMMENTS