पंजाबमधे काँग्रेसच्या अधोगतीला सुरूवात !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पंजाबमधे काँग्रेसच्या अधोगतीला सुरूवात !

एकीकडे भाजपने चार राज्यातील मुख्यमंत्री बदलले तरी कोणत्याही नेत्याने जाहीरपणे तक्रारीचा सूर केला नाही. गुजरातमध्ये तर मुख्यमंत्रीच नव्हे तर अख्खे मंत

शेतकर्‍यांचा जीव टांगणीला
अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक
खरा न्याय जनतेच्या दरबारातच …


एकीकडे भाजपने चार राज्यातील मुख्यमंत्री बदलले तरी कोणत्याही नेत्याने जाहीरपणे तक्रारीचा सूर केला नाही. गुजरातमध्ये तर मुख्यमंत्रीच नव्हे तर अख्खे मंत्रिमंडळ बदलण्यात आले, तरी देखील कोणत्याही आमदार किंवा मंत्र्यांने बंडाची भाषा केली नाही. मात्र पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. आणि तेथे अमरदिंर सिंग मुख्यमंत्री आहेत. पंजाबचे वैशिष्टय म्हणजे, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची हवा असतांना देखील पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांनी काँगे्रसची एकहाती सत्ता आणली. त्यांनी केलेले नियोजन, आणि संघटनात्मक बांधणीमुळे पंजाबमध्ये काँग्रेसला यश मिळवता आले, त्याचे संपूर्ण श्रेय सिंग यांना आहे. कारण ते लोकनेता आहे. त्यामुळे साहजिकच भाजपसारख्या बलाढय पक्षाला पंजाबमध्ये चारीमुंडया चीत करता आले. एकीकडे भाजप, तर दुसरीकडे आम आदमी पक्ष पंजाबमध्ये आपले पाय पसरण्याची संधी शोधतांना दिसून येत आहे. अशा वेळी काँग्रेस जर पंजाबमध्ये नेतृत्वबदल करत असेल, तर तो त्यांचा मूर्खपणा ठरेल. एका लोकनेत्याला डावलून, ज्याला कोणताही जनाधार नाही, अशा नवज्योतसिंग सिद्धूवर विश्‍वास ठेऊन काँग्रेस जर पंजाबमध्ये सत्ताबदल करत असेल, तर हा काँगे्रसचा ढोंगीपणा ठरणार आहे.
काँगे्रसने शेवटी अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. मात्र या राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि नवज्योतसिंग सिद्धूने काय साधले, तर याचे उत्तर नकारात्मकच मिळते. अमरिंदर सिंग हे पंजाबमध्ये मासलिडर नेते म्हणून ओळखले जातात. तर दुसरीकडे सिद्धू यांची प्रतिमा विश्‍वासार्ह नाही. अमरिंदर सिंग यांची तेथील जन-माणसांमध्ये घट्ट अशी पकड आहे. अशा लोकनेत्याला पदावरून डावलून काँगे्रसने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. आणि त्यांनी देखील राजीनामा दिला.
2022 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पंजाबात राजकीय वातावरण गरम आहे. त्यात पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे थेट दोन गट पडले आहेत. सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षातच आव्हान दिले आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून सिद्धू यांची वर्णी लावून काँग्रेस हायकमांडनेही सिद्धूच्या पारड्यात वजन टाकलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नवज्योत सिद्धू हे काँग्रेसचा चेहरा असतील असं बोललं जात आहे.
पंजाबमध्ये बंडाळी उफाळून येण्यास, 40 आमदारांचे एकत्रित येणे याला नवज्योतसिंग सिद्धू यांची फूस असल्याचे लपून राहिलेले नाही. खरे म्हणजे सिद्धू याला पंजाब काँगे्रसचे प्रदेशाध्यक्षपद देण्याची चुक काँगे्रसने करायला नको होती. कारण सिद्धू हा काही आश्‍वासक चेहरा नाही. सिद्धू कधी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम नाही. त्यामुळे काँगे्रसच्या हायकमांडने तरी सिद्धूच्या आहारी जाण्याची आवश्यकता नव्हती. अमरिंदर सिंग सारखा स्वाभिमानी नेता सिद्धू आणि काँगे्रसच्या अंतर्गत राजकारणामुळे अनेकवेळेस दुखावला जात होता. त्यामुळे काँगे्रसमध्ये असा अपमान सहन होणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा देखील सिंग यांनी काँगे्रसला दिला होता. तरी देखील काँगे्रसने कोणताही अर्थ न घेता, सिंग यांना राजीनामा द्यायला सांगणे याचाच अर्थ पंजाबमध्ये काँगे्रसची अधोगती सुरू झाल्याचा हा संदेश आहे. काँगे्रसकडे दोन-तीन राज्यांमध्ये सत्ता आहे. मात्र ही सत्ता देखील त्यांना टिकवता येत नाही. बंडाळी मोडून काढता येत नाही, हे काँगे्रसचे अपयशच म्हणावे लागेल. पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या 25 आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावले होते. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्‍वासने देण्यात आली होती. त्यामुळे बंडखोर आमदारांना बळ मिळाले होते. शिवाय या आमदारांना सिद्धू यांचे पाठबळ असल्यामुळे त्यांनी सिंग विरोधात उघड आघाडी उठवली होती. त्याचा परिणाम पंजाबमध्ये काँगेसचे नेतृत्वबदल होणार आहे. यातून काँगे्रसची पंजाबमध्ये अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली असेच म्हणावे लागेल.

COMMENTS