कोपरगाव: मतदारसंघातील सामाजिक व पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि समाजबांधवांची मागणी पूर्ण करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महायुती सरकार
कोपरगाव: मतदारसंघातील सामाजिक व पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि समाजबांधवांची मागणी पूर्ण करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महायुती सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय योजनेअंतर्गत मतदारसंघातील विविध ६ महत्त्वपूर्ण विकासकामांसाठी तब्बल १ कोटी १० लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रलंबित सामाजिक कामांना गती मिळणार आहे. यामध्ये कोपरगाव नगरपरिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारण्यासाठी २५ लाख रुपये, कोळगाव थडी येथे दलित वस्ती समाज मंदिर बांधण्यासाठी १५ लाख रुपये, जेऊर कुंभारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात संरक्षक भिंत व सुशोभीकरणाच्या कामासाठी १० लाख रुपये, काकडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपये, करंजी येथे संत रविदास महाराज मंदिर सभा मंडप बांधकामासाठी १५ लाख रुपये आणि धामोरी येथे संविधान भवन बांधकामासाठी ३० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे.
मतदारसंघातील सर्व समाजघटकांना सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी सुसज्ज इमारती व सुविधा मिळाव्यात अशी स्थानिक समाजबांधवांची अनेक दिवसांची मागणी होती. या मागणीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मागणीची तत्परतेने दखल घेऊन पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मंजूर झाला असून, प्रलंबित कामे मार्गी निघणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. निधी मंजूर करून आणल्याबद्दल सर्व समाजबांधवांनी आमदार आशुतोष काळे यांचे विशेष आभार मानले आहेत.

COMMENTS