पिंपळनेर: बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील ईट ते पिंपळनेर तसेच ईट ते गुंदावडगाव या तीन ते चार किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आह

पिंपळनेर: बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील ईट ते पिंपळनेर तसेच ईट ते गुंदावडगाव या तीन ते चार किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्या काळी वाहतुकीची साधने मर्यादित होती आणि अवजड वाहनांची ये-जा क्वचितच असायची. मात्र, सध्या या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला असून त्या प्रमाणात हा रस्ता अतिशय अरुंद आणि धोकादायक बनला आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; अपघातांचे प्रमाण वाढले
पिंपळनेर गाव हे गेवराई विधानसभा मतदारसंघात येत असून या परिसरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच सततच्या धक्क्यांमुळे अनेक प्रवाशांना मणक्याचे आजार जडले आहेत. लोकप्रतिनिधी स्वतः बंदिस्त चारचाकी गाड्यांमधून प्रवास करत असल्याने त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास दिसत नाही, असा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. प्रत्येक निवडणुकीत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली जात असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.
विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या रस्त्याची पाहणी करावी आणि त्वरित रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

COMMENTS