बीड: नशामुक्त, जागरूक आणि सशक्त पिढी घडविण्यासाठी बीड जिल्ह्यात माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै त

बीड: नशामुक्त, जागरूक आणि सशक्त पिढी घडविण्यासाठी बीड जिल्ह्यात माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मेगा ड्राईव्ह अभियान राबविण्यात येत आहे. तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी माय भारत पोर्टलवर १५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माय भारत जिल्हा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा युवा अधिकारी सत्यजित संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, समाज कल्याणचे विशेष अधिकारी उमेश देशपांडे, सहाय्यक आयुक्त संजय गुरव, सहायक प्रकल्प अधिकारी शेखर पोहनेरकर, अशासकीय संस्थेचे तत्वशिल कांबळे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
२८ जुलै रोजी बीडमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन
निरोगी आणि समृद्ध भारतासाठी नशामुक्त भारत अभियानाचा भाग म्हणून येत्या दि. २८ जुलै २०२६ रोजी बीड येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालय येथे विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये लोकगीत गायन स्पर्धा (नशामुक्ती विषयावर), नृत्य स्पर्धा (शास्त्रीय, लोकनृत्य किंवा समकालीन), पथनाट्य/मूकनाट्य (व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम), चित्रकला स्पर्धा (व्यसनमुक्ती संकल्पनेवर), वादविवाद स्पर्धा, लघुपट/रील्स स्पर्धा (६० सेकंदांची डिजिटल रील), घोषवाक्य लेखन स्पर्धा आणि स्लॅम पोएट्री (३ ते ५ मिनिटे) या विविध स्पर्धांचा समावेश आहे.
विजेत्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी
जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते राज्य व राष्ट्रीय स्तरावर बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. वय १५ ते २९ वर्षे वयोगटातील सर्व युवक-युवतींना वैयक्तिक किंवा गट स्वरूपात यामध्ये सहभागी होता येईल. माय भारत पोर्टलवर क्यूआर कोड स्कॅन करून किंवा अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करणे आवश्यक आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे, प्रमाणपत्रे आणि नशामुक्त व विकसित भारत अभियानात योगदान देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

COMMENTS