Homeताज्या बातम्या

ग्रो-मोअर प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा; डॉ. राजेंद्र पिपाडा यांची पोलिस महासंचालकांकडे मागणी

राहाता: शिर्डी येथील ग्रो-मोअर फायनान्स आर्थिक फसवणूक प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांची संपत्ती जप्त करावी,

आसूड मोर्चातून काँग्रेसचा सरकारविरोधात हल्लाबोल; नांदेडमध्ये तिन्ही जिल्हाध्यक्षांनी स्वीकारला पदभार
पेपरफुटीचे ’धंदे’ अन् बेरोजगारांचे ’फास’: किनवटमध्ये व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारा सत्याग्रह!
नांदेडमधील कोचिंग क्लासेस सुरक्षित आहेत का? लखनऊ दुर्घटनेनंतर अभ्यासिका आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

राहाता: शिर्डी येथील ग्रो-मोअर फायनान्स आर्थिक फसवणूक प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांची संपत्ती जप्त करावी, तसेच शिर्डी मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी आणि दहशतीच्या घटनांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक (डीजीपी) यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.

यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करत ग्रो-मोअर फायनान्स प्रकरणात मोठे आमिष दाखवून नागरिकांची प्रचंड आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप केला. या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या प्रसंगी त्यांची कन्या ट्विंकल पिपाडा देखील उपस्थित होती.

निवेदनात भाऊसाहेब थोरात, राजाराम साळवे, अरुण नंदन आणि पूजा गोकुळ पोटींडे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मुख्य आरोपीकडून दीड कोटी रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून ती रक्कम तात्काळ हस्तगत करून ती ठेवीदारांना परत देण्याची आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीवर व्यक्त केली चिंता

शिर्डी मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारीकडेही डॉ. पिपाडा यांनी पोलिस महासंचालकांचे गांभीर्याने लक्ष वेधले. शेतकऱ्याच्या मुलाची झालेली निर्घृण हत्या, साईबाबा मंदिर परिसरातील खून, कामगारांच्या हत्या तसेच साखळी चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारीला वेळीच आळा घातला नाही, तर शिर्डीच्या प्रतिमेवर परिणाम होऊन भाविकांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त करत, शिर्डीचे पावित्र्य आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी विशेष कडक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली.

COMMENTS