नांदेड जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असून जिल्ह्याला मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा

नांदेड जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असून जिल्ह्याला मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. त्याचवेळी मतदार यादीतील बोगस नावे वगळण्याच्या भूमिकेचे समर्थन करताना, एखादी व्यक्ती प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी वास्तव्य करत नसेल तर तिला तेथील रहिवासी म्हणून शासकीय योजनांचा लाभ कसा देता येईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
खा. अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेला भेट देऊन महापौर, आयुक्त, नगरसेवक आणि संबंधित अधिकार्यांसोबत शहरातील विविध प्रश्नांवर बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शहराच्या विकासासह मतदार यादी, शासकीय योजना, रस्ते, अतिक्रमणे आणि विष्णुपुरी येथील पुलाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली. मतदार यादीतील नावांच्या पडताळणीसंदर्भात बोलताना खा.चव्हाण म्हणाले की, एखादा मतदार संबंधित पत्त्यावर वास्तव्यास नसल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला त्या भागातील रहिवासी म्हणून शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रश्न निर्माण होतो. मतदार यादीतील बोगस नावे वगळल्यास खर्या आणि पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वेळेवर आणि प्रभावीपणे देता येईल. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले. नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथील पुलाचा काही भाग ढासळल्याच्या बातम्या आणि छायाचित्रे समोर आल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सखोल आणि तांत्रिक चौकशी होणे आवश्यक आहे. चौकशीतून वस्तुस्थिती आणि जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नांदेड शहरातील अतिक्रमणे, खराब रस्ते आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिक तसेच नगरसेवकांनी खासदार चव्हाण यांच्याकडे विविध तक्रारी मांडल्या. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. तारासिंग मार्केट परिसरातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केल्यास त्याच्या कामाला गती मिळू शकते, अशी सूचनाही त्यांनी केली. आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नांदेड शहराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून मंजूर झालेली अनेक कामे आजही सुरू आहेत, असे सांगत खा.चव्हाण म्हणाले, मी सध्या मंत्री नसलो तरी राज्यात सत्ता आमचीच आहे. त्यामुळे नांदेडच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

COMMENTS