परदेशी भूमीवर परराष्ट्रमंत्र्यांवर कबुलीची नामुष्की

Homeसंपादकीयदखल

परदेशी भूमीवर परराष्ट्रमंत्र्यांवर कबुलीची नामुष्की

एखाद्या देशाच्या अपयशाची कबुली, तीही परदेशी भूमीवर द्यावी लागणं ही नामुष्कीच असते.

महायुती आणि महाविकास आघाडीतील साम्य !
निवडणूक धोरण आणि आयुक्त निवड ! 
फडणवीसांची आक्रमकता अन् विरोधकांची हतबलता!

एखाद्या देशाच्या अपयशाची कबुली, तीही परदेशी भूमीवर द्यावी लागणं ही नामुष्कीच असते. भारताचे परराष्ट्रमंत्री इंग्लंडच्या दौर्‍यावर असतानाच भारताच्या कोरोनाच्या हाताळणीतील अपयशाची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली जात होती. सरकारवर टीकेची झोड उठविली जात होती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अखेर इंग्लंडमध्ये असताना आरोग्य व्यवस्थेतील अपयशाची कबुली दिली. 

कोरोनाच्या हाताळणीत टाळेबंदी हा एकमेव उपाय असल्याचा भ्रम सरकार आणि जनतेचाही झाला आहे. देशातील बर्‍याच भागात टाळेबंदी असूनही ती कडक नसल्यानं कोरोनाबाधितांचं प्रमाण कमी व्हायला तयार नाही. अजूनही ऑक्सिजनअभावी श्‍वास कोंडून नागरिकांचे मृत्यू होतात. अंत्यविधीची प्रतीक्षा थांबायला तयार नाही. रेमडेसिव्हिरचा काळाबाजार सुरूच आहे. बेडस्चा शोध घेता घेताच अनेकांना इहलोकीची यात्रा संपवावी लागत आहे. ते थांबलेलं नाही. उच्च न्यायालयं, सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्था दररोज सरकारच्या कोरोना व्यवस्थापनावर ताशेरे ओढत असताना सरकारच्या प्रयत्नांत खोट आहे, असं म्हणण्यासारख्या घटना घडत आहेत. कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. पहिल्या लाटेच्या वेळी यंत्रणांनी प्रभावीपणे काम केलं होतं. आता मात्र त्यांच्यात शैथिल्य आलं आहे. अर्थव्यवस्थेला प्राधान्य देताना निर्बंधांत सूट दिली आहे. त्याचा गैरफायदा लोक घेत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सामूहिक शहाणपण आलेलं नाही. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी जास्त तरतूद केली. कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली; परंतु तरीही सरकारनं लसीकरणाच्या खर्चाची जबाबदारी राज्यांवर टाकली आहे. लस वितरणातील गोंधळ चार महिन्यांनंतरही सरकारला थांबविता आला नाही. सरकार एकीकडं लसीकरणाचे टप्प्यामागून टप्पे जाहीर केले जात आहेत; परंतु त्यासाठी पुरेशा लसींचा पुरवठा केला जात आहे, की नाही, हे पाहिलं जात नाही. एकीकडं सरकार लसीकरणाचा आग्रह धरीत असताना दुसरीकडं लसीकरणाचं उद्दिष्ट गाठता येणार नाही, असंच नियोजन आहे. कोरोनाची दुसरी लाट कधी संपेल, याची शाश्‍वती नसताना आता तिसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आणि ती थोपवता येऊ शकणार नाही, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी आता लसी अद्ययावत करणं आवश्यक आहे. तसंच लसीकरण कार्यक्रमाला वेग देणं गरजेचं आहे. देशात कोरोना संसर्गामुळं रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात अनेक लोकांचा बळी गेला आहे, असं डॉ. के विजय राघवन यांनी सांगितलं. ज्या उच्चस्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे, ते पाहता कोरोनाची तिसरी लाटही थोपवता येणार नाही; पण ही तिसरी लाट कधी येईल हे अद्याप स्पष्ट नाही. आपल्याला तिसर्‍या लाटेपासून सतर्क राहिले पाहिजे. लसी अद्ययावत करण्यासाठी बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे, असं राघवन यांनी सुचविले आहे. आपण मात्र देशात बनविल्या जात असलेल्या दोन लसीच कशा उपयुक्त आहेत, असं सांगून पाठ थोपटून घेत आहोत.

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी होत नाही. गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक तीन हजार 780 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार भारतातील कोरोनानं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता दोन लाख 26 हजार 188 इतकी झाली आहे. एकाच दिवशी तीन लाख 82 हजार 315 इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात आता कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 34 लाख 87 हजार 229 इतकी झाली आहे तर पॉझिव्हिटी रेट 24.80 टक्क्यांवर गेला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या हाताळणीत जागतिक किर्तीच्या अर्थशास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी, महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कडक भाषेत टीका केली होती. कोरोनावरील उपाययोजनांत सरकारला अपयश आल्याची टीका करण्यात येत होती. त्याचा सरकारमधील काहींनी प्रतिवाद केला होता; परंतु लंडनच्या दौर्‍यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याची कबुली दिली. जी-7 देशांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाला निवडणुका कारणीभूत असल्याच्या प्रश्‍नाला जयशंकर यांनी उत्तर दिलं. निवडणुका अटळ आहेत, त्या रोखू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. भारत हा लोकशाही देश आहे आणि लोकशाहीत निवडणुका होणार नाही हे शक्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. भारतातील कोरोनाची दुसरी लाट ही मोठं आव्हान आहे. या संकटात जगभरातून मिळत असलेल्या मदतीबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. या संकटावेळी भारतासोबत संपूर्ण जग आहे, याची आम्हाला जाणीव आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं. कोरोनावरील लसीकरण मोहिमेला वेग देणं आणि जागतिक संकटात आवश्यक गोष्टी समजण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे. आम्ही या संकटातू बाहेर पडू; पण यातून एकजुटीच्या भावनेचा मोठा धडा मिळाला आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भारत सध्या ज्या स्थितीतून जातो आहे, त्यातून बहुतेक देश गेले आहेत. त्यांना भारताबद्दल संवेदना आहेत, असं जयशंकर म्हणाले. ब्रिटन, अमेरिका आणि आखाती देशांसह इतरांकडूनही अतिशय आवश्यक पुरवठा आणि मदत करत आहेत. हे जागतिक संकट एक बदल घेऊन आलं आहे आणि यामुळे विचारांमध्येही बदल होणार आहेत. आज कूटनीतीत एकजुटता दिसून येत आहे, हा चांगला धडा कोरोनानं घालून दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत. आरोग्य पथकं राज्यांमध्ये रवाना करण्यात आली आहेत. ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. दुर्दैवानं कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचं पाहून नागरिकांमध्ये आत्मविश्‍वास वाढला. ते गर्दी करीत आहेत; पण ही वेळ दोष देण्याची नाही. कोरोनाच्या या संकटात कुठल्याही प्रकारच्या गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाही; पण असेही प्रसंग येतात, ज्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. यासाठी कुणाला दोष देणं योग्य नाही. गेल्या 75 वर्षांमध्ये आपण आरोग्य व्यवस्थेत अतिशय कमी गुंतवणूक केली. यामुळं आता आरोग्य यंत्रणेचा पर्दाफाश झाला आहे. आयुषमान भारत योजनेवर भर दिला जात आहे. आरोग्य हा मूलभूत अधिकार आहे; पण संकटावेळी जनतेला धोरणात्मक स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. त्यांना वास्तविक उत्तर पाहिजे, असं जे जयशंकर म्हणाले, ते महत्त्वाचं आहे. जयशंकर हे सांगत असतानाच केंद्र सरकारनं आरोग्यासाठी दीड टक्क्यांच्या आत तरतूद केली जाते. आरोग्यासाठीच्या तरतुदीतही हात घालून ती इतरांकडं वळविली जात आहे. कोविड 19 साथी विरोधात लढण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल जयशंकर यांनी ब्लिंकन यांचे आभार मानले. ब्लिंकन यांच्याशी चर्चेत रेमडेसिव्हिर व प्राणवायूचा पुरवठा वाढवणं, लसीचं उत्पादन वाढवणं या मुद्यांच्या अनुषंगानं त्यांनी काही मुद्दे मांडले. अमेरिकेनं कठीण काळात प्राणवायू व रेमडेसिव्हिर औषध पुरवठयात भारताला मदत केली. अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितलं, की दोन्ही नेत्यांनी कोविड 19 विरोधातील उपाययोजनांवर चर्चा केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळात व जी 7 देशांत सहकार्यावर त्यांनी भर दिला. अमेरिका व भारत यांच्यातील द्विक्षीय संबंध व्यापक होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोविड मदतीबाबत तसंच इतर काही मुद्दयांवर आमच्यात चर्चा झाली. लस क्षमता वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. अमेरिकेत कोविड लाट जोरात असताना भारतानंही मदत केली होती, याचा ब्लिंकन यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.

COMMENTS