बीड येथील कल्याण पिंगळे दाजी पब्लिक स्कूलची इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु. अनुजा प्रदीप मोराळे हिने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत उल्लेखनीय यश स

बीड येथील कल्याण पिंगळे दाजी पब्लिक स्कूलची इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु. अनुजा प्रदीप मोराळे हिने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. बीड जिल्हा योग असोसिएशनच्या वतीने आयोजित स्पर्धेत अनुजाने 8 ते 10 वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावत आगामी 45 व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याच्या अधिकृत संघात निवड मिळवली आहे.
5 जुलै 2026 रोजी बीड येथे आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणीत जिल्ह्यातील अनेक गुणवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत अनुजाने आपल्या उत्कृष्ट लवचिकतेचे, संतुलनाचे आणि योगासन कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करून परीक्षकांची मने जिंकली. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिने मुलींच्या 8 ते 10 वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवून शाळेसह बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. आता महाराष्ट्र योग असोसिएशनच्या वतीने 1 व 2 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे आयोजित 45 व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत अनुजा मोराळे बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. जिल्हास्तरीय निवड चाचणीत प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंची जिल्हा संघात निवड करण्यात आली असून त्यामध्ये अनुजाचा समावेश झाला आहे. या यशाबद्दल बीड जिल्हा योग असोसिएशनच्या वतीने अनुजाचा मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी श्री. विकास गवते (अध्यक्ष, महाराष्ट्र योग असोसिएशन), श्री. विनायक वझे (अध्यक्ष, बीड जिल्हा योग असोसिएशन), इंजी. नितीन गोपन (अध्यक्ष, पतंजली योग समिती, बीड), श्रीमती राधा तांबे (आंतरराष्ट्रीय योग खेळाडू), श्री. रामचंद्र ठोसर (राज्य पंच) आणि श्रीमती सारिका पवार (राज्य पंच) यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी अनुजाचे अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. अनुजाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे पालक, शिक्षक, कल्याण पिंगळे दाजी पब्लिक स्कूलचे व्यवस्थापन, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेतही ती उत्कृष्ट कामगिरी करून बीड जिल्ह्याचा नावलौकिक वाढवेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे.

COMMENTS