राज्य शासनाने पानमसाला, सुगंधित जर्दा व गुटखा यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातलेली असतानाही भोकर शहरात प्रतिबंधित गुटखा व जर्द्याच
राज्य शासनाने पानमसाला, सुगंधित जर्दा व गुटखा यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातलेली असतानाही भोकर शहरात प्रतिबंधित गुटखा व जर्द्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शहरातील काही सुपारी स्टोअर्स, गोळी भांडार आदी नावांनी सुरू असलेल्या दुकानांमधून गुटखा व जर्द्याची सर्रास विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि अवैध गुटखा व्यवसायाविरोधात कठोर कारवाया सुरू असताना, भोकरमध्ये मात्र हा अवैध व्यवसाय सुरूच असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करून तो शहरासह ग्रामीण भागात पुरविला जात असल्याचीही चर्चा आहे. तसेच हातगाड्यांवरूनही बिनधास्तपणे प्रतिबंधित गुटखा विकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भोकर हे तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असल्याने तेथून अवैधरित्या गुटखा आणून स्थानिक किरकोळ विक्रेत्यांना चढ्या दराने पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे. संबंधित गोदामांची सखोल चौकशी झाल्यास मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त होण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या मते, संबंधित विभागाकडून प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने गुटखा विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भोकर शहरातील प्रतिबंधित गुटखा विक्रीवर तातडीने धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS