नवी दिल्ली: नीट प्रश्नपत्रिका गळती आणि केंद्रीय शिक्षण मंडळाच्या परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला न

नवी दिल्ली: नीट प्रश्नपत्रिका गळती आणि केंद्रीय शिक्षण मंडळाच्या परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रविवारी अनिश्चितकालीन उपोषणास प्रारंभ केला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाचा हा नववा दिवस ठरला आहे.
आंदोलनकर्त्यांनी २० जूनपासून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. उपोषण सुरू होताच मोठ्या संख्येने विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी जंतर-मंतरवर एकत्र आले. उपोषणास प्रारंभ करण्यापूर्वी सोनम वांगचुक आणि आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केले. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून उपोषणाची सुरुवात करण्यात आली. दीपके यांनी शेतकरी, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अलीकडील एका मुलाखतीत काही घटक जाणीवपूर्वक शिक्षण व्यवस्थेला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता. देशाच्या एकात्मतेविरोधात काम करणाऱ्या शक्तींना पाठिंबा दिला जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना अभिजित दीपके यांनी, आम्ही देशाचे करदाते आहोत; विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रश्न उपस्थित करणे हा आमचा लोकशाही अधिकार आहे, असे स्पष्ट केले. तसेच प्रश्नपत्रिका गळती रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणतणावाची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी या वेळी केला.

COMMENTS