श्रीरामपूर: तालुक्यातील टाकळीभान येथील देशी दारू दुकानात मॅनेजरला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून खोलीत कोंडत रोख रक्कम व सोन्याची चैन असा एकूण १ लाख
श्रीरामपूर: तालुक्यातील टाकळीभान येथील देशी दारू दुकानात मॅनेजरला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून खोलीत कोंडत रोख रक्कम व सोन्याची चैन असा एकूण १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश रामास्वामी दुलम (वय ४४) हे टाकळीभान येथील आर. एन. कापसे यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानात गेल्या २० वर्षांपासून मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी त्यांनी आपल्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवली होती. त्याच ड्रॉवरमध्ये दुकानातील ४८ हजार रुपयांची रोख रक्कमही ठेवलेली होती.
दुपारी साडेचारच्या सुमारास दुलम हे आराम करत असताना इकबाल उर्फ सोन्या शेख हा त्यांच्या खोलीत आला. त्याने थेट एक लाख रुपयांची खंडणी मागितली. दुलम यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने कंबरेला लावलेला गावठी कट्टा दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वतःवर अनेक गुन्हे असल्याचे सांगून दुकानात दहशत निर्माण केली.
यानंतर आरोपीने मॅनेजर दुलम यांना गोदामाच्या खोलीत बळजबरीने कोंडून ठेवले. त्यानंतर दुकानातील काउंटरवर जाऊन तेथे बसलेले दिलीप येवले यांनाही धाक दाखवला आणि गल्ल्यातील ४८ हजार रुपयांची रोकड व ड्रॉवरमधील सोन्याची चैन बळजबरीने घेऊन तो फरार झाला. घटनेनंतर दुलम यांनी आरडाओरडा केल्यावर एका ग्राहकाने धावून येत त्यांची खोलीतून सुटका केली. याप्रकरणी नरेश दुलम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी इकबाल शेख उर्फ सोन्या (रा. टाकळीभान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS