श्रीगोंदा: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील गव्हाणवाडी शिवारात कार चालकाला अडवून मारहाण करत त्याच्याकडील तब्बल २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या

श्रीगोंदा: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील गव्हाणवाडी शिवारात कार चालकाला अडवून मारहाण करत त्याच्याकडील तब्बल २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीला बेलवंडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबन मल्हारी औटी (वय ४५, रा. खांदा कॉलनी, पनवेल, जि. रायगड) हे १९ जून २०२६ रोजी त्यांच्या मूळ गावी नांदा (ता. आष्टी, जि. बीड) येथे आले होते. गावातील कामकाज आटोपून ते २० जून रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कारने पनवेलकडे परत निघाले होते. दरम्यान, २१ जून रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता त्यांची गाडी श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी शिवारातील स्वामी समर्थ हॉटेलसमोर आली असता त्यांनी लघुशंकेसाठी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले.
त्यावेळी ३ ते ४ अज्ञात इसमांनी त्यांच्याजवळ येऊन “तू इथे गाडी का थांबवली?” असा जाब विचारत वाद घातला. त्यानंतर आरोपींनी बबन औटी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि डॅशबोर्डमध्ये ठेवलेली २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांना त्यांच्याच गाडीत बसवून वाहन शिरूरच्या दिशेने नेले आणि काही अंतरावर सोडून दिले.
आरोपी निघून गेल्यानंतर जखमी अवस्थेतील बबन औटी यांनी तात्काळ ११२ या पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधून मदतीची मागणी केली. माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य केले. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान सुरज अविदास ओहोळ (रा. पिंपरी कोलंदर), संकेत रमेश शेळके (रा. नारायण गव्हाण, ता. पारनेर), शुभम दिलीप गायकवाड (रा. गोलेगाव, ता. शिरूर, जि. पुणे), क्षितिज दादासाहेब ओहोळ व मयूर तुळशीराम ओहोळ (रा. पिंपरी कोलंदर) यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींना त्यांच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

COMMENTS