बीड : जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांसाठी विशेष मार्गदर्शन व जनजागृती
बीड : जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांसाठी विशेष मार्गदर्शन व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना हक्काच्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विविध कल्याणकारी योजनांचे सविस्तर मार्गदर्शन
यावेळी नायब तहसीलदार सुहास हजारे, प्रशांत जाधवर आणि अण्णासाहेब वंजारे यांनी उपस्थित महिलांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पात्रतेचे निकष आणि लाभ मिळविण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अधिकार्यांनी केले.
शिबिरात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सहाय्य योजना तसेच महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. एकल महिलांसाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन आणि इतर कल्याणकारी लाभांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशासनाचा महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार
महिलांना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, महाऑनलाइन केंद्रांमार्फत सेवा, उत्पन्न व अधिवास प्रमाणपत्र, आधार संलग्नीकरण, बँक खाते उघडण्याची प्रक्रिया तसेच विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांबाबतही माहिती देण्यात आली. उपस्थित महिलांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाला आम्रपाली साबळे, अयशा रेहाना पठाण तसेच संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता, स्वावलंबन आणि न्याय्य हक्कांसाठी शासन कटिबद्ध असून, प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. शिबिरात सहभागी झालेल्या महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

COMMENTS