बीड : शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणार्या अतिक्रमणांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवत अतिक्रमणधारकांना फूल देऊ

बीड : शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणार्या अतिक्रमणांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवत अतिक्रमणधारकांना फूल देऊन अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले. मात्र, या समज मोहिमेनंतरही नियमांचे उल्लंघन करून रस्ते, फूटपाथ, नाले अथवा सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणार्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
अतिक्रमण धारकांना प्रशासनाचे आवाहन
जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, बीड नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सम्राट कदम तसेच अतिक्रमण विभागाचे प्रमुख मुन्ना गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये जाऊन व्यापारी, हातगाडीधारक आणि अतिक्रमणधारकांना फुले देत प्रशासनाने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. शहरात अनेक ठिकाणी रस्ते व फूटपाथ अतिक्रमणामुळे अरुंद झाले असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी तसेच अपघाताचा धोका वाढत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे हटवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी केले.
फूटपाथवर पादचार्यांचाच हक्क; थेट कारवाईचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी अतिक्रमणधारकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फूटपाथवरील हक्क हा केवळ पादचार्यांचा असल्याचे स्पष्ट केले असतानाही काहीजण सार्वजनिक जागांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत आहेत, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार समज देऊनही फूटपाथ अडवणाऱ्यांवर आता केवळ सूचना न देता थेट प्रत्यक्ष कारवाई केली जाईल. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात दंडात्मक तसेच अन्य कठोर कायदेशीर पावले उचलली जातील, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले असून आगामी काळात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

COMMENTS