गुरुग्राम : भारतीय लोकसंस्कृतीतील लोकनायक आणि लोकनायिकांच्या सामाजिक योगदानाचा अभ्यास करणारी तीन दिवसीय राष्ट्रीय संशोधन परिषद गुरुग्राम येथील एस

गुरुग्राम : भारतीय लोकसंस्कृतीतील लोकनायक आणि लोकनायिकांच्या सामाजिक योगदानाचा अभ्यास करणारी तीन दिवसीय राष्ट्रीय संशोधन परिषद गुरुग्राम येथील एसजीटी विद्यापीठात उत्साहात पार पडली. लोकायन संस्था, मुंबई, प्रज्ञा संस्था, नवी दिल्ली आणि एसजीटी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 6 जून दरम्यान आयोजित या परिषदेत देशभरातील प्राध्यापक, संशोधक, कलाकार आणि अभ्यासक सहभागी झाले.
‘भारतीय लोकसंस्कृतीचे लोकनायक-लोकनायिका : सामाजिक भूमिका आणि समर्पण’ या विषयावर झालेल्या परिषदेत विविध राज्यांतील लोकनायकांच्या जीवनकार्याचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा सखोल आढावा घेण्यात आला. कालांतराने विस्मरणात गेलेल्या अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक घटनांवरही अभ्यासकांनी प्रकाश टाकला. परिषदेदरम्यान संशोधनपर लेखसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. हेमंत वर्मा, प्र-कुलपती प्रा. डॉ. जगदीश्वर राव बसुतकर, प्रज्ञा संस्थेचे देवेंद्र राय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेचे संकल्पनाकार आणि संयोजक म्हणून लोकायन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मोनिका ठक्कर आणि सचिव योगेश्वर लोळगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
उज्जैन येथील विक्रम विद्यापीठाचे डॉ. शैलेंद्र कुमार शर्मा यांनी, मन, कर्म आणि वचनाने समाजासाठी निःस्वार्थ समर्पण करणारी व्यक्तीच खर्या अर्थाने लोकनायक किंवा लोकनायिका ठरते, असे मत व्यक्त केले. ज्येष्ठ विचारवंत मुरारी शरण शुक्ल यांनी सामाजिक समतेचा विचार मांडताना वेदांमध्ये वर्ण किंवा जातीच्या आधारावर भेदभावाला स्थान नसल्याचे सांगितले. परिषदेसोबत आयोजित ‘लोकायन लोकोत्सवा’त महाराष्ट्र आणि हरियाणाच्या समृद्ध लोककलेचे दर्शन घडले. महाराष्ट्रातील तालवाद्य कचेरी, पिंगळा, भारूड, अभंग, लावणी, पोवाडा, तुंबडी आणि गोंधळ यांसारख्या लोककलांना राष्ट्रीय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच हरियाणातील पारंपरिक लोकनृत्यांनीही उपस्थितांची दाद मिळवली.

COMMENTS