बीड : आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदावर झालेल्या नियुक्तीवरून नवा वाद निर्माण झाला असून, या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या ओमप्

बीड : आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदावर झालेल्या नियुक्तीवरून नवा वाद निर्माण झाला असून, या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या ओमप्रकाश शेटे यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शुभम शिंदे आणि राजेंद्र नवले यांनी मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप करत मूळ कागदपत्रांची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश शेटे यांची यापूर्वी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या कक्ष प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीसोबत शासनाच्या धोरणानुसार मानधन व इतर सुविधा देण्याचाही उल्लेख होता. दरम्यान, 20 मार्च 2025 रोजी सकाळी 11.31 वाजता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार संबंधित फाईलवर टिपणी काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या टिपणीत आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक अत्राम यांनी ओमप्रकाश शेटे यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत नोंद केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्याच दिवशी दुपारी 3.24 वाजता ही फाईल आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयात सादर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या फाईलवर आरोग्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीची नोंद नसल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सहा मिनिटांनंतर म्हणजे दुपारी 3.30 वाजता हीच फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीसह अंतिम झाल्याचे दस्तावेजांमधून समोर आल्याचे आरोपकर्त्यांचे म्हणणे आहे.एकाच दिवशी टिपणी झालेल्या फाईलवर अत्यंत कमी कालावधीत अंतिम आदेश निघाल्याने नियुक्ती प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. आरोग्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीशिवाय फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे कशी पोहोचली आणि मंजुरी कशी मिळाली, याबाबत विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणात ओमप्रकाश शेटे आणि आरोग्य विभाग वादाच्या केंद्रस्थानी आले असून, माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मूळ दस्तावेजांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नियुक्ती प्रक्रियेत नियमभंग, दिशाभूल किंवा प्रशासकीय अनियमितता आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शासन आणि आरोग्य विभाग या प्रकरणावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS