Homeताज्या बातम्या

मुखेडच्या मुख्याध्यापकाला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेबदली करून देणे, नोटीस न देणे आणि ‘हप्ता’ प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला शालेय खर्चाच्या नावाखाली दरमहा हप्ता वसूल करणे, कर्मचार्‍याची बदली करून देणे तसेच नोटीस न

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण
कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही : पंतप्रधान मोदीभारताची ताकद त्याच्या संस्कृती, श्रद्धा आणि विचारांमध्ये
पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई

मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला शालेय खर्चाच्या नावाखाली दरमहा हप्ता वसूल करणे, कर्मचार्‍याची बदली करून देणे तसेच नोटीस न देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी सायंकाळी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार (वय 38) हे हुतात्मा माधव विद्यालय, मुखेड येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार (वय 51) यांनी शालेय खर्चाच्या नावाखाली जानेवारी 2026 ते मे 2026 या पाच महिन्यांसाठी प्रतिमहिना 12 हजार रुपये हप्ता मागितला होता. तसेच तक्रारदारांची बदली करून देण्यासाठी आणि त्यांना कोणतीही नोटीस न बजावण्यासाठी स्वतंत्रपणे रकमेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी करताना 3 जून रोजी तक्रारदारांनी शासकीय पंचासह मुख्याध्यापक पडलवार यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी नांदेडमधील शारदानगर येथील निवासस्थानी बोलावून घेतले. पडताळणीदरम्यान पडलवार यांनी शासकीय पंचासमक्ष 60 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र चर्चेनंतर त्यांनी 50 हजार रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शविली. यावेळी आता यापुढे तुला हप्ता देण्याची गरज नाही, यातच तुझी बदली करून घेतो, असेही त्यांनी तक्रारदाराला सांगितल्याचे एसीबीने नमूद केले आहे. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदार व शासकीय पंच यांना आरोपीच्या शारदानगर येथील निवासस्थानी पाठविण्यात आले. तेथे मुख्याध्यापक पडलवार यांनी तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. कारवाईनंतर आरोपीची अंगझडती घेण्यात आली. त्यामध्ये विवो कंपनीचा मोबाईल फोन, पिवळ्या धातूची अंगठी, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र तसेच 5 हजार 500 रुपये रोख रक्कम आढळून आली. मोबाईलची तपासणी करण्यात येत असून आवश्यकतेनुसार तो जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंद झाल्यानंतर अटक करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांनी कारवाईचे पर्यवेक्षण केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीती जाधव करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकार्‍यावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, शासकीय व निमशासकीय संस्थांमधील भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

COMMENTS