Homeताज्या बातम्या

नांदेड विधान परिषदेत जादूची कांडी फिरलीतिरंगी लढतीत राजूरकरांचे पारडे जड, जवळगावकर, सुमठाणकर, प्रवीण चिखलीकर यांची माघार

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर राजकीय घडामोडींनी अनपेक्षित कलाटणी घेतली असून, शेवटच्या क्षणी फि

नांदेड महापौरपदाची रंगतदार चुरस : खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मनात नेमके कोण?
मराठवाड्यातील सहकारी दूध संस्थांसोबत भागीदारीचा निर्णय ‘अमूल’ने घ्यावा; केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
नांदेड विधान परिषद भाजपाच्या वाट्यालाराजूरकर परिवाराची उमेदवारी जवळपास निश्चित?


नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर राजकीय घडामोडींनी अनपेक्षित कलाटणी घेतली असून, शेवटच्या क्षणी फिरलेल्या जादूच्या कांडीमुळे निवडणुकीचे संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. एकेकाळी बहुरंगी आणि अटीतटीची वाटणारी ही निवडणूक आता तिरंगी लढतीत परिवर्तित झाली असून महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर यांचे पारडे स्पष्टपणे जड झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
नामांकन अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय राजकीय हालचालींनी अनेकांच्या अंदाजांना छेद दिला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रविण पाटील चिखलीकर, काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगावकर तसेच काँग्रेसचेच रामदास पाटील सुमठाणकर यांनी माघार घेतल्याने निवडणुकीतील समीकरणे एका क्षणात बदलली. यामुळे आता भाजप-महायुतीचे अमर राजूरकर, उद्धव ठाकरे शिवसेनेचे कृष्णा पाटील आष्टीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांच्यात सरळ तिरंगी सामना रंगणार आहे. या निवडणुकीत महायुतीत बिघाडी होऊन भाजप व राष्ट्रवादी आमनेसामने येतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र अंतिम क्षणी दिल्ली-मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर नांदेडमधील राजकारणाला नवे वळण मिळाले. भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महायुतीची एकजूट कायम असल्याचा संदेश दिला. त्यानंतर काही तासांतच प्रविण चिखलीकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीपर्यंत कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे खा.अशोकराव चव्हाण आणि आ.प्रताप पाटील चिखलीकर यांची वाढती राजकीय जवळीक या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. या दोन्ही नेत्यांनी दाखविलेल्या समन्वयामुळे महायुतीच्या मतांमध्ये होणारी संभाव्य फूट टळली आणि राजूरकर यांचा विजयाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला. दरम्यान, महाविकास आघाडीने राज्यभर एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसच्या रामदास सुमठाणकर यांनीही वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचा मान राखत माघार घेतली. काँग्रेस, ठाकरे सेना आणि शरद पवार गट यांची मते एकवटून कृष्णा पाटील आष्टीकर यांना पाठबळ देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. एकूणच, उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींनी नांदेड विधान परिषद निवडणुकीचे गणित पूर्णपणे बदलून टाकले आहे. आता निवडणूक तिरंगी असली तरी संघटनात्मक ताकद, सत्ताधारी महायुतीची एकजूट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ लक्षात घेता अमर राजूरकर यांचे पारडे प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अधिक जड मानले जात आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. आता राजकीय वर्तुळाचे लक्ष तिरंगी लढतीतील मतांचे अंतिम गणित आणि महायुतीच्या एकजुटीचा निकालावर होणारा परिणाम याकडे लागले आहे

COMMENTS