कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत राशीन परिसर

कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत राशीन परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून ६०० लिटर कच्चे रसायन व १८० लिटर तयार गावठी दारू जप्त केली. जप्त केलेला साठा जागीच नष्ट करण्यात आला.
पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राशीन गावाजवळील ढगे वस्ती परिसरात गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह छापा टाकला. गावाच्या शिवारातील ओढ्याच्या कडेला झुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या हातभट्टीवर ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान अंकुश सिताराम जानभरे (वय ५५, रा. जानभरे वस्ती, राशीन, ता. कर्जत) हा गावठी दारू निर्मिती करत असल्याचे आढळून आले. घटनास्थळी तीन प्लास्टिकच्या पिंपांमध्ये साठवलेले सुमारे ६०० लिटर कच्चे रसायन तसेच १८० लिटर तयार गावठी दारू आढळली. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ४८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पंचनामा करून आवश्यक नमुने रासायनिक विश्लेषणासाठी जप्त केले. उर्वरित कच्चे रसायन व तयार दारू जागीच नष्ट करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कर्जत पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी अवैध दारू निर्मिती, मटका, जुगार, गोवंश तस्करी आणि अन्य बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले होते. राशीनमधील ही कारवाई त्या मोहिमेतील महत्त्वाची कारवाई मानली जात असून त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कर्जत तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. कोणत्याही बेकायदेशीर धंद्याला पाठीशी घातले जाणार नाही.- हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक

COMMENTS