नांदेड पोलीस दलातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पदासाठी सुरू असलेल्या हालचालींना अखेर पूर्णविराम मिळाला असून,

नांदेड पोलीस दलातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पदासाठी सुरू असलेल्या हालचालींना अखेर पूर्णविराम मिळाला असून, पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांची देगलूर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून एलसीबीचा पदभार मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बोलमवाड यांचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेला विशेष महत्त्वाचे स्थान मानले जाते. गंभीर गुन्ह्यांची उकल, विशेष मोहिमा आणि जिल्ह्यातील संवेदनशील कारवायांमुळे या शाखेकडे अनेक वरिष्ठ अधिकार्यांचे लक्ष असते. त्यामुळे या शाखेचा कारभार मिळविण्यासाठी अनेक पोलीस निरीक्षकांमध्ये नेहमीच स्पर्धा पाहायला मिळते. पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड गेल्या काही वर्षांपासून स्थानिक गुन्हे शाखेत काम करण्यास इच्छुक होते. जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असताना त्यांनी एलसीबीच्या पदासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र यापूर्वीही त्यांच्या आशांवर पाणी फिरले होते. त्यावेळी अचानक झालेल्या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर उदय खंडेराय यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाल्यानंतर पुन्हा एकदा बोलमवाड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र प्रशासनाने देगलूरचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सोपविला. भोसले यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठाण्यांमध्ये बदल्यांची प्रक्रिया गतीमान झाली. या प्रक्रियेत देगलूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारोती मुंडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली, तर त्यांच्या जागी सूर्यमोहन बोलमवाड यांची नियुक्ती करण्यात आली. तेलंगणा व कर्नाटक सीमेलगत असल्यामुळे देगलूर पोलीस ठाणे हे संवेदनशील आणि महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे बोलमवाड यांच्याकडे आता मोठी जबाबदारी आली असली तरी स्थानिक गुन्हे शाखेची संधी हुकल्याची खंत त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, या बदल्यांमुळे नांदेड पोलीस दलातील अंतर्गत समीकरणे आणि वरिष्ठ पातळीवरील हालचाली पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

COMMENTS