Homeताज्या बातम्याबीड

माणसाने इतरांच्या कामी येता येईल असे जीवन जगावे-कबीर महाराज आतारखटोड प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव उत्साहात संपन्न

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात माणसाने स्वतःला जपणे अत्यंत आवश्यक आहे. तारुण्यात केलेला परमार्थ, साधना आणि सत्कर्मे हीच उतारवयात खरे समाध

लातूरमध्ये एसटी पुलावरुन कोसळली
यशवंत स्टडी क्लबच्या दोन विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड
ठाकरेंविरोधात पुण्यासह डोंबिवली मध्ये शिंदे गटाकडून बॅनरबाजी



आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात माणसाने स्वतःला जपणे अत्यंत आवश्यक आहे. तारुण्यात केलेला परमार्थ, साधना आणि सत्कर्मे हीच उतारवयात खरे समाधान आणि आनंद देतात. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घेत, कमीत कमी अपेक्षा ठेवून इतरांच्या उपयोगी पडेल असे जीवन जगावे, असे भावपूर्ण प्रतिपादन पुणे येथील प्रख्यात कीर्तनकार कबीर महाराज आतार यांनी केले.
बीड येथील स्वर्गीय झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात मंगळवारी (दि. 12) कबीर महाराज आतार यांची सांप्रदायिक कीर्तनसेवा मोठ्या उत्साहात पार पडली. प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड व पदाधिकार्‍यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनसेवेसाठी कबीर महाराजांनी संत तुकाराम महाराज यांच्या घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥ या अभंगाची निवड केली होती. या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी संतांच्या जीवनातील निःस्वार्थ भाव स्पष्ट केला. संतांसाठी मोक्ष हा मोठा विषय नसतो, तर मोक्षच त्यांच्या घरी काम करतो. संतांनी कधीही ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितले नाही, म्हणूनच ते संतपदाला पोहोचले, असे प्रभावी निरूपण त्यांनी केले. या कीर्तनसेवेला बीड शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेतला.
अपेक्षा संपली की सुख सुरू होते
माणूस आयुष्यभर अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत असतो. जोपर्यंत अपेक्षा संपत नाहीत, तोपर्यंत खरे सुख मिळू शकत नाही. धन कमवा, मात्र अधिकाधिक अपेक्षांच्या मागे धावू नका. मनावर नियंत्रण ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुढील पिढीसाठी संपत्ती निर्माण करताना स्वतःसाठीही जगायला शिकले पाहिजे, असा मोलाचा संदेश कबीर महाराज आतार यांनी दिला.
सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती
कीर्तनादरम्यान कबीर महाराजांनी आरोग्याच्या महत्त्वावरही भाष्य केले. भरपूर पैसा असण्यापेक्षा ज्याचे शरीर निरोगी आणि सुदृढ आहे, तोच आजच्या काळात खर्‍या अर्थाने सुखी आहे, असे ते म्हणाले. चांगला आहार-विहार, संयमित जीवनशैली आणि आत्मचिंतन यामुळे जीवन अधिक समृद्ध होते. मी कोण आहे, कुठून आलो आणि कुठे जायचे आहे? या प्रश्नांची उत्तरे ज्याला सापडतात, त्याचा परमार्थाचा मार्ग अधिक सुलभ होतो, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS