कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत दिवंगत गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून तब्बल सुमारे साडेतीन दशकांनंतर नव्याने वाद उभा राहिला

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत दिवंगत गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून तब्बल सुमारे साडेतीन दशकांनंतर नव्याने वाद उभा राहिला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशकाला दूरध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पुढे आल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणातील कथित ध्वनिमुद्रण समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर वाद अधिकच तीव्र झाला असून, विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक प्रथम प्रकाशित झाल्यापासून ते विचारमंथनाचा विषय राहिले आहे. मात्र, यावेळी पुस्तकाच्या आशयापेक्षा शीर्षकावरूनच वाद निर्माण झाला आहे. आमदार गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना संपर्क साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अवमानकारक पद्धतीने केल्याचा आरोप केला. शिवाजी महाराजांविषयी अशा प्रकारे प्रश्न विचारणारे कोण? असा सूर त्यांच्या प्रतिक्रियेत दिसून आल्याचे समजते. समोर आलेल्या ध्वनिमुद्रणात आक्रमक भाषा वापरण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रकाशकाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे लोकप्रतिनिधींच्या भाषेची पातळी, सार्वजनिक वर्तन आणि जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकीय वर्तुळात तसेच सामाजिक क्षेत्रात या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाद वाढत असताना आमदार संजय गायकवाड यांनी दृश्य संदेश प्रसिद्ध करून आपली बाजू मांडली. त्यांनी शिवाजी महाराजांविषयी असलेली भावना अधोरेखित केली असली, तरी पुस्तकाच्या शीर्षकावर घेतलेला आक्षेप त्यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे वाद निवळण्याऐवजी आणखी गहिरे होण्याची चिन्हे दिसत आहेत.
टीका करण्यापूर्वी अभ्यास करावा : प्रशांत आंबी
या प्रकरणात प्रकाशक प्रशांत आंबी यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित पुस्तक हे त्यांचे लेखन नसून गोविंद पानसरे यांचे आहे. तसेच हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले असून त्यात कोणत्याही प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नसल्याचे त्यांनी नमूद केले. टीका करण्यापूर्वी पुस्तकाचा संपूर्ण अभ्यास करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली असल्याचेही समोर आले आहे.
कोल्हापुरात तक्रार दाखल
प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी प्रशांत आंबी यांनी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रशांत आंबी याच्यासोबत त्याचे इतर सहकारी आणि गोविंदराव पानसरे यांचे कुटुंबीय देखील पोलीस स्टेशनमध्ये दाकल झाले आहेत. फोनवर अश्लील शिवीगाळ करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे, जीभ कापण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे.

COMMENTS