मुंबई : भारतीय ध्वज असलेले तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करत भारतात सुरक्षित प्रवेश केला आहे. सध्या हे जहाज मुंबई

मुंबई : भारतीय ध्वज असलेले तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करत भारतात सुरक्षित प्रवेश केला आहे. सध्या हे जहाज मुंबई किनार्यापासून काही नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात नांगर टाकून उभे आहे. 18 एप्रिल रोजी होर्मुझमधून प्रवासाला सुरुवात केलेल्या या टँकरने मोठ्या प्रमाणात कच्चे तेल भारतात आणले आहे. आखाती भागात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवास महत्त्वाचा मानला जात असून, जहाजाच्या सुरक्षित आगमनामुळे देशातील इंधनपुरवठ्याबाबत दिलासा मिळाला आहे.
या जहाजावर 31 भारतीय खलाशी कार्यरत असून, सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. तणावपूर्ण परिस्थितीतही जहाजाने आपला प्रवास अखंड सुरू ठेवत भारतात पोहोचणे ही उल्लेखनीय बाब मानली जात आहे. मार्चपासून आखाती प्रदेशात वाढलेल्या तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करणे धोकादायक ठरत असताना, ‘देश गरिमा’ हे असे यशस्वीपणे प्रवास पूर्ण करणारे दहावे भारतीय जहाज ठरले आहे.यापूर्वी काही भारतीय जहाजांना या मार्गावर अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. काही प्रकरणांत गोळीबाराच्या घटनांमुळे जहाजांना माघारी फिरावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘देश गरिमा’चे सुरक्षित आगमन अधिक महत्त्वाचे ठरत आहे. दरम्यान, व्यापारी जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने आपली ठाम भूमिका मांडली असून, या मार्गाने जाणार्या भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी संबंधित देशांकडे करण्यात आली आहे. भारत आणि इराण यांच्यातील पारंपरिक संबंध लक्षात घेता, या परिस्थितीत परस्पर सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS