नवी दिल्ली : देशातील प्रमुख विमान सेवा कंपनी एअर इंडिया मध्ये मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत असून मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी रा

नवी दिल्ली : देशातील प्रमुख विमान सेवा कंपनी एअर इंडिया मध्ये मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत असून मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा मान्य केल्याची चर्चा असून ते येत्या सप्टेंबरमध्ये पद सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विल्सन यांची नियुक्ती 2022 मध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ मूळत: 2027 पर्यंत होता. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे ते नियोजित मुदतीपूर्वीच पदमुक्त होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताचा अंतिम तपास अहवाल आल्यानंतरच नव्या मुख्य कार्यकारी अधिकार्याची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघाताचा प्राथमिक अहवाल यापूर्वीच प्रसिद्ध झाला असून अंतिम अहवाल लवकरच अपेक्षित आहे. या अहवालावरून पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले जाते. कंपनीने नव्या नेतृत्वाच्या शोधाला आधीच सुरुवात केली असून संभाव्य उमेदवारांशी उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या बैठका होणार असल्याने या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. विल्सन यांनी करार संपल्यानंतर पद सोडण्याचे संकेत यापूर्वीच दिल्याने ही प्रक्रिया काही महिन्यांपूर्वीच सुरू झाल्याचेही समोर आले आहे. कॅम्पबेल विल्सन यांना विमान वाहतूक क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी कारकीर्दीची सुरुवात प्रशिक्षणार्थी म्हणून केली आणि पुढे विविध देशांत महत्त्वाच्या जबाबदार्या सांभाळल्या. एअर इंडियात येण्यापूर्वी ते कमी खर्चातील आंतरराष्ट्रीय विमान सेवेत नेतृत्व करत होते. व्यवस्थापन, विक्री व विपणन या क्षेत्रातही त्यांनी मोठा ठसा उमटवला आहे. एअर इंडियासाठी हा नेतृत्व बदलाचा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी काळात नव्या प्रमुखावर कंपनीचे पुनरुत्थान, विश्वासार्हता आणि जागतिक स्पर्धेत स्थान मजबूत करण्याची जबाबदारी असणार आहे.
एअर इंडियासमोर आर्थिक आव्हानांचा दबाव
सध्या एअर इंडिया अनेक आव्हानांना सामोरी जात आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे विमान मार्गांमध्ये बदल करावे लागत असून इंधन खर्च वाढला आहे. याचा थेट परिणाम दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणांवर झाला आहे. तसेच नव्या विमानांच्या वितरणात होत असलेल्या विलंबामुळे विस्तार योजनांवर परिणाम झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कंपनीला कार्यक्षमता आणि आर्थिक स्थैर्य यांचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

COMMENTS