देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा शहरातील दशक्रिया विधी स्थळावर काकस्पर्श होत नसल्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, मृत व्यक्तींच्या दशक्रिया

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा शहरातील दशक्रिया विधी स्थळावर काकस्पर्श होत नसल्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, मृत व्यक्तींच्या दशक्रिया विधीसाठी नागरिकांना तीर्थक्षेत्र पुणतांबा येथे जावे लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. धार्मिक परंपरेशी निगडित असलेल्या या प्रश्नामुळे अनेक कुटुंबांची भावनिक व धार्मिक अडचण वाढली आहे.
शहरातील दशक्रिया विधी ठिकाणी पिंडदानानंतर कावळा पिंडाला शिवत नसल्याने विधी पूर्ण झाल्याची धार्मिक भावना निर्माण होत नाही, अशी नागरिकांची भावना आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना तासन्तास काकस्पर्शाची प्रतीक्षा करूनही अपेक्षित विधी पूर्ण होत नसल्याने अखेरीस पुणतांबा येथे जाऊन दशक्रिया विधी पार पाडण्याचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
हिंदू धर्मपरंपरेनुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि पितरांच्या तृप्तीसाठी दशक्रिया विधीला विशेष महत्त्व आहे. दहाव्या दिवशी पिंडाला कावळ्याने स्पर्श करणे किंवा अन्न ग्रहण करणे याला “काकस्पर्श” असे म्हणतात. काकस्पर्श झाल्यास मृतात्म्यास गती मिळते आणि त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचे मानले जाते, अशी धार्मिक धारणा आहे.
मात्र देवळाली प्रवरा येथील दशक्रिया स्थळी अनेक वेळा पहाटेपासून विधीसाठी आलेल्या कुटुंबांना काकस्पर्शाची प्रतीक्षा करावी लागते. काही वेळा दीर्घ प्रतीक्षेनंतरही कावळा पिंडाला स्पर्श करत नसल्याने कुटुंबीयांमध्ये मानसिक अस्वस्थता निर्माण होते. परिणामी, धार्मिक विधी निर्विघ्न पार पडावा या हेतूने नागरिक पुणतांबा या पारंपरिक तीर्थक्षेत्राकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या मते, दशक्रिया विधी ही केवळ धार्मिक परंपरा नसून कुटुंबाच्या भावनिक समाधानाशी जोडलेली प्रक्रिया आहे. त्यामुळे विधी अपूर्ण राहिल्याची भावना मनात राहू नये म्हणून अनेक जण अतिरिक्त खर्च सहन करूनही पुणतांबा येथे जाण्याचा निर्णय घेत आहेत.
चौकट
पर्यावरणीय आणि शास्त्रोक्त पद्धतींची पूर्तता करण्याची मागणी
देवळाली प्रवरा येथील दशक्रिया विधी स्थळाचे धार्मिक महत्त्व पुन्हा पूर्ववत व्हावे आणि नागरिकांना स्थानिक पातळीवरच विधी पार पाडता यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी पर्यावरणीय आणि काही इतर शास्त्रोक्त पद्धतींची आवश्यकता असल्यास त्या गोष्टींची पूतर्ता नागरिकांच्या मदतीने शासन-प्रशासनाने करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

COMMENTS