मुंबई : भारतीय भांडवली बाजाराला गुरुवारी मोठा धक्का बसला असून प्रमुख निर्देशांकांमध्ये तीव्र घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असले

मुंबई : भारतीय भांडवली बाजाराला गुरुवारी मोठा धक्का बसला असून प्रमुख निर्देशांकांमध्ये तीव्र घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तेजी एका दिवसातच नाहीशी झाली आणि गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, शेअर बाजाराच्या घसरणीमुळे कोट्यावधी रूपये बुडाले.
शेअर बाजारातील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 12 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 439 लाख कोटींवरुन 427 लाख कोटींवर आलं आहे. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. दिवसाच्या सुरुवातीलाच विक्रीचा प्रचंड दबाव दिसून आला. सकाळी बाजार उघडताच निर्देशांक घसरू लागले आणि दिवसभर तीच स्थिती कायम राहिली. अखेरच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल 2496 अंकांनी, म्हणजे सुमारे 3.26 टक्क्यांनी घसरून 74,207 च्या आसपास बंद झाला. तर निफ्टीतही 700 हून अधिक अंकांची घसरण होत तो 23,000 च्या पातळीखाली येऊन स्थिरावला. सकाळच्या सत्रातच बाजारातील कमकुवतपणा स्पष्ट झाला होता. काही मिनिटांतच निर्देशांक मोठ्या प्रमाणात खाली आले होते. पूर्व-सुरुवातीच्या व्यवहारातच घसरणीचे संकेत मिळाले होते, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर विक्री केली. या घसरणीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसून आला. बँकिंग, वाहन, स्थावर मालमत्ता, वित्तीय सेवा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ग्राहक वस्तू, धातू आणि संरक्षण अशा सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण झाली. मोठ्या कंपन्यांबरोबरच मध्यम आणि लहान कंपन्यांचे समभागही दबावाखाली आले. विशेषतः बँकिंग आणि वाहन क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये तीन ते चार टक्क्यांपर्यंत घसरण झाली. सेन्सेक्समधील बहुतांश कंपन्यांचे समभाग लाल निशाणात होते, तर केवळ काही मोजक्याच समभागांनी सकारात्मक कामगिरी केली. या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडी हे प्रमुख कारण मानले जात आहे. मध्यपूर्वेत वाढत चाललेला तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तेल व वायू पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. परिणामी जागतिक पुरवठा साखळीवर दबाव येण्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याने गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे. एकूणच, जागतिक अस्थिरता, ऊर्जा सुरक्षेबाबतची चिंता आणि गुंतवणूकदारांचा कमी झालेला आत्मविश्वास यामुळे बाजारात ही तीव्र घसरण झाली आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय परिस्थिती स्थिर झाली तरच बाजाराला दिलासा मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

COMMENTS