गांधीनगर : मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. ‘शिवालिक’नंतर आता ‘नंदा देवी’

गांधीनगर : मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. ‘शिवालिक’नंतर आता ‘नंदा देवी’ हे दुसरे मोठे एलपीजी वाहक जहाज मंगळवारी गुजरात किनार्यावर दाखल झाले. या जहाजात तब्बल 46,500 मेट्रिक टनांहून अधिक द्रवित पेट्रोलियम वायूचा साठा आहे.
हे जहाज वाडिनार बंदर परिसरात पोहोचल्यानंतर सध्या अँकरेजवर उभे असून, पुढील टप्प्यात जहाजातून दुसर्या जहाजात वायू हस्तांतरण प्रक्रिया केली जाणार आहे. ही प्रक्रिया सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून पार पाडली जाणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. दीनदयाल बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष सुशील कुमार सिंह यांनी ‘नंदा देवी’ जहाजाला भेट देऊन कॅप्टन व कर्मचार्यांशी संवाद साधला. तसेच आवश्यक सुविधा आणि समन्वयाबाबतही त्यांनी आढावा घेतला. विशेष म्हणजे, हे जहाज युद्धसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे मार्गक्रमण करून भारतात पोहोचले आहे. वाढत्या भूराजकीय तणावाच्या काळात अशा मार्गाने येणारे हे भारताचे सलग दुसरे जहाज ठरले आहे. याआधी ‘शिवालिक’ हे जहाज मुंद्रा बंदरावर 46,000 मेट्रिक टन एलपीजीसह दाखल झाले होते. या जहाजांमधून आलेला एलपीजी साठा देशातील घरगुती वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अंदाजानुसार, एका जहाजातील गॅस सुमारे 14.2 किलो वजनाच्या लाखो घरगुती सिलेंडरच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे या पुरवठ्यामुळे देशातील एलपीजीची मागणी भागवण्यास मोठी मदत होणार आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने पाहता, अशा मोठ्या प्रमाणातील आयातीमुळे भारताला अल्पकालीन पुरवठा स्थिर ठेवणे शक्य होते. अधिकार्यांच्या मते, एका जहाजातील साठा देशाच्या जवळपास एका दिवसाच्या गरजेइतका ठरू शकतो. मध्य-पूर्वेतील तणाव आणि समुद्री मार्गावरील जोखमींच्या पार्श्वभूमीवरही भारताने ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ‘नंदा देवी’ आणि ‘शिवालिक’ या जहाजांच्या आगमनामुळे या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.

COMMENTS