Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहराचे विद्रुपीकरण रोखा; व्यापार्‍यांना अडथळा ठरणारे बॅनर्स त्वरित हटवा : नागरिकांची मागणी

नांदेड : नांदेड शहरात विविध कार्यक्रम, राजकीय मेळावे, वाढदिवस, जयंती-उत्सव तसेच स्वागतासाठी लावण्यात येणार्‍या बॅनर आणि होर्डिंग्जची संख्या दिवसे

गोठ्यात हातभट्टी दारू काढणार्‍यावर पोलिसांची धाड; हजारो रुपयांचे साहित्य नष्ट
टोमॅटोचे भाव कोसळले; लाल चिखल शेतकर्‍यांच्या नशिबी; कष्टांचे मोल न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी रस्त्यावर टाकला माल
नांदेड ग्रामीण पोलीस उप विभागासाठी  मोबाईल फॉरेन्सिक  व्हॅन  उपलब्ध   



नांदेड : नांदेड शहरात विविध कार्यक्रम, राजकीय मेळावे, वाढदिवस, जयंती-उत्सव तसेच स्वागतासाठी लावण्यात येणार्‍या बॅनर आणि होर्डिंग्जची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे शहराचे सौंदर्य विद्रुप होत आहे. रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकीय इमारतींच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर्स लावले जात असल्याने नागरिकांसह व्यापार्‍यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर त्वरित कारवाई करून ते हटवावेत, अशी मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गातून जोर धरत आहे.
शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, रस्ते, डिव्हायडर आणि पुलांच्या परिसरात विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनर्स लावले जात आहेत. अनेकदा या बॅनर्ससाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली जात नसल्याचे दिसून येते. परिणामी शहरातील सौंदर्य बिघडण्याबरोबरच वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरवर लावलेले बॅनर्स पुढील वाहनांचे दृश्य झाकून टाकत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेत ‘जनता राज’ आल्यानंतर शहरातील अनधिकृत बॅनर्सचा प्रश्‍न कमी होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात बॅनर्सची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जो उठेल तो आपल्या वाढदिवसाचे, स्वागताचे किंवा कार्यक्रमाचे बॅनर्स शहरात लावून स्वतःची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत असल्याने शहर अक्षरशः बॅनर्सच्या विळख्यात अडकले आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठांमध्ये दुकानदारांच्या फलकांसमोर किंवा दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे बॅनर्स उभे केले जातात. त्यामुळे ग्राहकांना दुकाने दिसत नाहीत, तसेच पादचारी मार्गही अडवले जातात. परिणामी व्यापार्‍यांच्या व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार व्यापारी संघटनांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर बॅनर्समुळे दुकानांच्या नावफलकांनाच झाकले जात असल्याने व्यापार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नवीन येणार्‍या पाहुण्यांना शहराचे पहिले चित्र हे बॅनर्सचेच दिसत असल्याने शहराची प्रतिमा खराब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हे शहर नागरिकांचे आहे की बॅनर्सचे? असा प्रश्‍नही अनेक जण उपस्थित करत आहेत. शहरातील प्रत्येक चौक, रस्ते आणि डिव्हायडरवर लावलेल्या मोठ्या बॅनर्समुळे शहराची ओळखच बदलत चालली असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. याबाबत नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरांनी नागरिक, सामाजिक संस्था तसेच राजकीय कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, शहरात अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्ज लावू नयेत. कोणतेही बॅनर किंवा होर्डिंग लावण्यापूर्वी महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असून नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महापौरांनी सांगितले की, अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या बॅनर-होर्डिंग्जमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात तसेच शहराच्या स्वच्छता आणि सौंदर्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून अशा अनधिकृत बॅनर्सवर कारवाई करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईही केली जाईल. तथापि, नागरिकांच्या मते केवळ आवाहन करून हा प्रश्‍न सुटणार नाही. प्रत्यक्षात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अनेक वेळा महापुरुषांच्या जयंती, उत्सव किंवा नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर्स कार्यक्रम संपल्यानंतरही अनेक दिवस त्याच ठिकाणी लटकलेले दिसतात. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

COMMENTS