Homeताज्या बातम्याराजकारण

युद्धाचा भडका कायम !भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधूनीतून परवानगी ?

नवी दिल्ली : इस्त्रायल-अमेरिका यांनी इराणविरोधात छेडेले युद्ध गुरूवारी तेराव्या दिवशीही सुरूच असून इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्लाह मुजतबा खाम

इराणवर अमेरिका-इस्रायलचा भीषण हल्ला; आयतुल्ला खामेनेई यांची मुलगी, जावई आणि नातीचा मृत्यू
युद्ध नको, शांतता हवी !
अन्यथा इराणच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करू : डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : इस्त्रायल-अमेरिका यांनी इराणविरोधात छेडेले युद्ध गुरूवारी तेराव्या दिवशीही सुरूच असून इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्लाह मुजतबा खामेनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्याच वक्तव्यात अमेरिकेला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मध्य पूर्वेतील अमेरिकेचे लष्करी तळ बंद करावे लागतील, अन्यथा त्या तळांवर हल्ले सुरूच राहतील.
लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात मृतांचा आकडा 687 वर पोहोचला आहे, अशी घोषणा माहिती मंत्री पॉल मोरकोस यांनी गुरुवारी केली. त्यांनी सांगितले की, मृतांमध्ये 98 मुले आहेत. पंधरा डॉक्टर आणि बचाव कर्मचारी देखील मृत्युमुखी पडले आणि 45 लोक जखमी झाले. पश्‍चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर भारतासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना सुरक्षित मार्गाने जाण्याची परवानगी दिली असली तरी, त्यावर केंद्र सरकारच्या वतीने अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि इराणी परराष्ट्र मंत्री गेल्या काही दिवसांत तीन वेळा चर्चा केली आहे. शेवटची चर्चा सागरी सुरक्षा आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रित होती. अधिक भाष्य करणे अकाली ठरेल. पश्‍चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीत हा निर्णय भारतासाठी महत्त्वाचा राजनैतिक टप्पा मानला जात आहे. वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक देशांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय जहाजे या मार्गाचा वापर करण्याबाबत सावध भूमिका घेत आहेत.  भारताने पश्‍चिम आशियातील देशांशी दीर्घकाळापासून समतोल संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा या संकटाच्या काळात दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारताची ऊर्जा गरज मोठ्या प्रमाणात आयात होणार्‍या कच्च्या तेलावर अवलंबून आहे. त्यामुळे होर्मुज सामुद्रधुनी हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जागतिक तेलवाहतुकीपैकी मोठा हिस्सा याच मार्गाने होत असल्यामुळे या प्रदेशात निर्माण होणारा तणाव जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम करतो.

तेराव्या दिवशीही संघर्ष सुरूच
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर सुरू झालेला संघर्ष आता तेराव्या दिवशी पोहोचला आहे. या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता वाढली असून सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. अनेक जहाजे पर्यायी मार्गांचा विचार करत आहेत, तर काही जहाजे बंदरांमध्ये थांबून परिस्थिती सामान्य होण्याची प्रतीक्षा करत आहेत. वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने अनेक देशांनी ऊर्जा सुरक्षेबाबत सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. इराणने या काळात होर्मुज सामुद्रधुनीतून जाणार्‍या जहाजांवर कडक निर्बंध लागू केले आहेत.

COMMENTS