Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

भारतात 22 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा

नवी दिल्ली : आशियाई स्तरावरील तिरंदाजीला चालना देणार्‍या महत्त्वाच्या स्पर्धांपैकी असलेल्या आशिया कप तिरंदाजीच्या दुसर्‍या आवृत्तीचे आयोजन 2027 म

कुटुंबियांना मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार
उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू वाहतूकीवर कारवाई : दोघे ताब्यात
चक्कर येवूनही चालकाचे प्रसंगावधान; बस शेतात घालून प्रवाशी सुरक्षित

नवी दिल्ली : आशियाई स्तरावरील तिरंदाजीला चालना देणार्‍या महत्त्वाच्या स्पर्धांपैकी असलेल्या आशिया कप तिरंदाजीच्या दुसर्‍या आवृत्तीचे आयोजन 2027 मध्ये नवी दिल्ली येथे होणार आहे. या निर्णयामुळे तब्बल 22 वर्षांनंतर भारतात पुन्हा एकदा मोठ्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन होणार आहे. जागतिक तिरंदाजी आशिया संघटनेच्या बैठकीत यास मान्यता देण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
भारताने यापूर्वी 2005 साली दिल्लीत आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. त्यानंतर दीर्घ काळानंतर भारताला पुन्हा अशा दर्जाच्या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय तिरंदाजी संघटनांच्या प्रतिनिधींनी भारतीय तिरंदाजी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून आयोजनासंदर्भातील प्राथमिक तयारीचा आढावा घेतला. जागतिक तिरंदाजी आशियाचे अध्यक्ष काझी राजीब उद्दीन अहमद चापोल सध्या कोलकाता दौर्‍यावर असून त्यांनी भारतीय तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस वीरेंद्र सचदेव यांची भेट घेतली. या भेटीत भारतातील आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाबाबतही सविस्तर चर्चा झाली. दिल्लीकडे आवश्यक सुविधा आणि आयोजनाचा अनुभव असल्याने ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय तिरंदाजी संघटनेने पुढाकार घेतल्यास भविष्यात आणखी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन भारतात करता येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठीही दिल्लीचा विचार केला जात असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे भारतात सलग मोठ्या स्पर्धांचे आयोजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धांच्या दृष्टीने भारतातील विविध शहरांनाही संधी मिळत आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे यावर्षी सप्टेंबरमध्ये आशियाई पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. तसेच कोलकाता शहरालाही अनेक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळणार आहे. 2026 मध्ये येथे दक्षिण आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. याआधी कोलकाताने 2009 मध्ये आशियाई तिरंदाजी ग्रँड प्रिक्सचे यजमानपद भूषविले होते. देशांतर्गत स्पर्धांच्या आयोजनाबाबतही काही प्रस्ताव पुढे आले आहेत. पुढील वर्षी वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा कोलकाता येथे घेण्याबाबत चर्चा सुरू असली तरी याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान, यावर्षीची राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा शिलाँग येथे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आशिया कप तिरंदाजी स्पर्धेच्या आयोजनामुळे भारतीय तिरंदाजीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच देशातील खेळाडूंना घरच्या मैदानावर उच्च दर्जाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याने या निर्णयाकडे क्रीडावर्तुळातून सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

COMMENTS