Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धानोरे घाटावर ‘शिवतीर्थ’ साकारअहिल्यानगर जिल्ह्यात पहिलेच स्थळ

सिंहासनारुढ छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे अनावरण  देवळाली प्रवरा : देवदेवतांची मंदिरे उभारलेली सर्वत्र पाहायला मिळतात, देशासाठी प्राणार्पण करण

गोठ्यात हातभट्टी दारू काढणार्‍यावर पोलिसांची धाड; हजारो रुपयांचे साहित्य नष्ट
देशात खतांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; इराण-इस्त्रायल युद्धामुळे खत आयातीवर होणार परिणाम
कपीलधार देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर गंभीर आरोप; देणगी निधी अपहार,बालविवाहास परवानगी,जैसे थे आदेशाचा भंग, या विषयाची चौकशी करून कारवाई करा-संदीपान चव्हाण,रमेश घुमके

सिंहासनारुढ छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे अनावरण

 देवळाली प्रवरा : देवदेवतांची मंदिरे उभारलेली सर्वत्र पाहायला मिळतात, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांचे पुतळेही अनेक ठिकाणी उभारले गेले आहेत; मात्र हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली अढळ श्रद्धा व्यक्त करण्यासाठी राहुरी तालुक्यातील धानोरे घाटावर ‘शिवतीर्थ’ उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे शिवतीर्थ निर्माण झाले असून यामुळे धानोरे गावाच्या ऐतिहासिक व धार्मिक वैभवात आणखी भर पडली आहे.

 प्रवरामाईच्या पवित्र काठावर वसलेला धानोरे घाट धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध मानला जातो. दक्षिण-उत्तर वाहिनी असलेल्या प्रवरामाईच्या किनाऱ्यावर असलेल्या या परिसरात प्राचीन धनेश्वर देवस्थान मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला असून त्यांनी येथे भव्य घाटही उभारला आहे. धनेश्वर देवस्थानासोबतच दत्त मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, भगवान विश्वकर्मा, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, गणेश मंदिर, शनी महाराज, गहिनीनाथ, अंबिका माता आणि खंडोबा मंदिर अशी अनेक देवस्थाने एकाच परिसरात असल्याने धानोरे घाटाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

 याच पवित्र आणि ऐतिहासिक भूमीत उभारण्यात आलेल्या ‘शिवतीर्था’मध्ये सुमारे १० फूट उंचीची सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. रायगडावरील मेघडंबरीच्या धर्तीवर हे शिवतीर्थ उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शिवतीर्थाचे काही बांधकाम अद्याप सुरू आहे.

कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे विशेष उपस्थित होत्या. त्यांनी शिवतीर्थ उभारणीसाठी २ लाख १ हजार रुपयांची देणगी देत या उपक्रमाला पाठबळ दिले. धानोरे गावातील ग्रामस्थांनी आज पर्यंत १५ लाख रुपये खर्च केला आहे. या ऐतिहासिक उपक्रमासाठी श्री क्षेत्र धनेश्वर देवस्थान ट्रस्ट, शिवतीर्थ व्यवस्थापन समिती, विविध युवक मंडळे तसेच धानोरे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सहकार्य केले.

COMMENTS