दोषींवर कठोर गुन्हा दाखल करा : वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी मुंबई : नागपूर येथील एका स्फोटक पदार्थ निर्मिती करणार्या कंपनीत झालेल्या भीषण स

दोषींवर कठोर गुन्हा दाखल करा : वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी
मुंबई : नागपूर येथील एका स्फोटक पदार्थ निर्मिती करणार्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 22 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. हा प्रकार केवळ अपघात किंवा हलगर्जीपणाचा परिणाम नसून व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेले हत्याकांड असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी विधानसभेत केला. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली.
या घटनेत एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असताना गुन्ह्यात लावलेली कलमे सौम्य का ठेवण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारच्या कलमांमुळे आरोपींना तात्काळ जामीन मिळण्याची शक्यता निर्माण होते, असे सांगत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर त्रुटी असल्याचेही वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडले. त्यांच्या मते, कंपनीत अग्निसुरक्षा यंत्रणा अत्यंत अपुरी होती. अग्निशमनासाठी आवश्यक साधने उपलब्ध नव्हती आणि जोखमीचे मूल्यमापनदेखील करण्यात आले नव्हते. नियमानुसार दोन सुरक्षा अधिकार्यांची आवश्यकता असताना केवळ एकच अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. तसेच वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेले डॉक्टर प्रत्यक्षात कंपनीत कार्यरत नव्हते, अशी माहितीही त्यांनी दिली. याशिवाय, स्फोटक पदार्थ हाताळणार्या संवेदनशील उद्योगातही अंतर्गत सुरक्षा तपासणीची कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचे त्यांनी नमूद केले. कामगारांना स्फोटके हाताळण्याबाबत आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले नसल्याने त्यांच्या जीवाशी थेट खेळ करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात केवळ कंपनी व्यवस्थापनच नव्हे तर संबंधित सरकारी यंत्रणांचीदेखील जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. संबंधित निरीक्षकांनी कंपनी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र कशाच्या आधारावर दिले, याची चौकशी करून त्या अधिकार्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. नागपूरमध्ये संबंधित विभागाचे मुख्यालय असतानाही नियमित तपासणी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी दोषी अधिकार्यांना निलंबित करून त्यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारकडे केली.

COMMENTS