काकीनाडा ः आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्हा येथे शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. वेटलापलेम गावातील फटाक्यांच्या न

काकीनाडा ः आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्हा येथे शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. वेटलापलेम गावातील फटाक्यांच्या निर्मिती करणार्या कारखान्यात अचानक झालेल्या स्फोटात किमान 20 कामगारांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शनिवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. त्या वेळी कारखान्यात वीसपेक्षा अधिक कर्मचारी काम करत होते. स्फोट इतका प्रचंड होता की त्याचा आवाज सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. धडाक्याने आसपासच्या शेतांपर्यंत हादरे बसले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाच्या तीव्रतेमुळे काही मृतदेह कारखान्याबाहेरील भातशेतीत फेकले गेले. हिरव्यागार शेतात विखुरलेले अवशेष आणि जखमींची आर्त किंकाळी यामुळे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य निर्माण झाले. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. उपलब्ध साधनांचा वापर करून मृतदेह हलविण्याचे प्रयत्न करण्यात आले. पोलिस आणि बचाव पथकांनी परिसरातील शेतांमध्ये शोधमोहीम राबवून विखुरलेले मृतदेह आणि अवशेष शोधण्याचे काम हाती घेतले. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काही जखमींना नव्वद ते शंभर टक्क्यांपर्यंत भाजल्या असल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू असून विशेष वैद्यकीय पथक कार्यरत आहे. या दुर्घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकार्यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. प्रशासनाने मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे. राज्याच्या गृहमंत्री वंगालपुडी अनिता यांनीही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा फटाक्यांच्या कारखान्यांमधील सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने संकेत दिले आहेत. या भीषण स्फोटाने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.

COMMENTS