जैनब शेख बाल चित्रकला स्पर्धेत प्रथम, पुरस्काराने सन्मानित कर्जत : तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्

जैनब शेख बाल चित्रकला स्पर्धेत प्रथम, पुरस्काराने सन्मानित
कर्जत : तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी जैनब फतेहमोहम्मद शेख हिने राज्यस्तरीय शासकीय बाल चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत कर्जत तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. ठाम दृढनिश्चय असेल तर यश मिळतेच. अपुऱ्या सुविधांवर मात करत मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित शासकीय बाल चित्रकला स्पर्धेत जैनब शेख हिला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. सांगली येथे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन व पुरस्कार वितरण सोहळ्यात तिचा सन्मान करण्यात आला. मंत्री पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व १० हजार रुपयांचा धनादेश देऊन तिला गौरविण्यात आले.
या वेळी खासदार विशाल पाटील, कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, कला संचालनालय तथा अध्यक्ष नियामक मंडळ डॉ. किशोर इंगळे, ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर, कोरेगावचे सरपंच युवराज शेळके, जैनबचे पालक हुसैन शेख व तायरा शेख, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजय थोरात, वर्गशिक्षिका सौ. शितल भोसले व मुख्याध्यापिका संध्या जगताप उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने केवळ जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर राज्यात अव्वल येणे ही मोठी कामगिरी आहे. हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” पुढील वर्षापासून या पुरस्कारासाठी २० हजार रुपये प्रोत्साहनपर मानधन देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
सरपंच युवराज शेळके यांनी जैनबच्या यशाचे कौतुक करत, “गरीब कुटुंबातील मुलीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही कोरेगावसाठी अभिमानाची बाब आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचे प्रोत्साहन यामुळेच हे शक्य झाले,” असे सांगितले.
गटशिक्षण अधिकारी प्रदीप चव्हाण, विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड, केंद्रप्रमुख दिवेकर, शाळेतील शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जैनब व तिच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले. शितल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जैनबने हे यश संपादन केले असून कोरेगाव परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS