Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

भंडारा : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणार्‍या नवजात बालिकेच्या कथित विक्रीप्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य

चुनाभट्टीत रस्ता खचला दुचाकी आणि चारचाकी वाहने पडली खड्यात
“त्या” गुरुजींच्या बदल्यांना यादीची प्रतीक्षा
विद्यार्थ्यानी बळी पडू नये

भंडारा : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणार्‍या नवजात बालिकेच्या कथित विक्रीप्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून समोर आलेल्या डॉक्टर नीतेश बाजपेयी यांनी अटकेच्या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले असून तपास यंत्रणांसमोर नवे प्रश्‍न उभे राहिले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 14 फेब्रुवारी रोजी कटंगीहून भंडार्‍याकडे येताना त्यांनी स्वतःच्या वाहनातच धारदार वस्तूने अंगावर वार करून घेतले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने तुमसर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना भंडार्‍यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या आत्महत्येच्या प्रयत्नामागे अटकेची भीती आणि पोलिसांचा वाढता ससेमिरा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अधिकृतरीत्या याबाबत तपास सुरू असून सर्व बाबींची शहानिशा केली जात आहे. दहा दिवसांच्या बालिकेच्या कथित विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या एका दाम्पत्याला ‘मोफत उपचार’ या आमिषाने भुलवून त्यांच्या मुलीचा लाखो रुपयांत व्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या व्यवहारात अडीच ते तीन लाख रुपयांची रक्कम फिरणार होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. या संपूर्ण साखळीमागे डॉक्टर बाजपेयी हे प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गोंदिया येथे ते ‘न्यू बालाजी हॉस्पिटल’चे संचालक म्हणून कार्यरत आहेत. या रुग्णालयाच्या माध्यमातूनच संपर्क आणि व्यवहाराची साखळी रचण्यात आल्याचा तपास अधिकार्‍यांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
या प्रकरणी एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर डॉक्टर बाजपेयी यांच्यावरही स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची सखोल चौकशी होणार असल्याचे पोलिसांकडून संकेत देण्यात आले आहेत. ही घटना केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित नाही; तर ती समाजातील असुरक्षितता आणि गरिबीचा गैरफायदा घेणार्‍या प्रवृत्तींचे भयावह रूप अधोरेखित करते. नवजात बालकांच्या विक्रीसारखे अमानुष प्रकार रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्था, सामाजिक कल्याण यंत्रणा आणि कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये अधिक समन्वयाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

COMMENTS