डेहराडून : उत्तराखंडातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिर येथील कपाट 2026 सालासाठी 22 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. महाशि

डेहराडून : उत्तराखंडातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिर येथील कपाट 2026 सालासाठी 22 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिर येथे पंचांग पाहणी व वैदिक मंत्रोच्चारांनंतर हा मुहूर्त जाहीर करण्यात आला. या घोषणेमुळे देशभरातील शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परंपरेनुसार भगवान केदारनाथांची पंचमुखी डोली नियोजित कार्यक्रमाप्रमाणे धामाकडे प्रस्थान करणार आहे. 18 एप्रिल रोजी उखीमठ येथे भैरवनाथांची विशेष पूजा होईल. 19 एप्रिलला डोली उखीमठ येथून फाट्याकडे रवाना होईल. 20 एप्रिलला गौरीकुंड येथे मुक्काम करून 21 एप्रिल रोजी केदारनाथ धामात आगमन होईल. त्यानंतर 22 एप्रिल रोजी सकाळी विधीपूर्वक कपाट उघडण्याचा सोहळा पार पडेल. यंदा केदारनाथ धामात मुख्य पुजारी म्हणून गंगाधर महाराज जबाबदारी स्वीकारणार आहेत. मदमहेश्वर धामासाठी शिवशंकर लिंग उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरातील पूजा व्यवस्थेची देखरेख करतील, तर बागेश लिंग यांच्याकडे अतिरिक्त धार्मिक कार्यभार सोपविण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला. या सजावटीसाठी मुझफ्फरनगर येथील अभिनव सुशील यांनी सहकार्य केले. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी देश-विदेशातील भाविकांना शुभेच्छा देत चारधाम यात्रेसाठी आमंत्रण दिले. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुलभ तीर्थयात्रेचा अनुभव देण्यासाठी राज्य शासन व प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक तयारी केली जात आहे.

COMMENTS