xr:d:DAF1XU2IAWM:54,j:8318560495602170102,t:23121118 अहिल्यानगर : धनादेश न वटल्याप्रकरणी अहिल्यानगर येथील १० वे अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी

अहिल्यानगर : धनादेश न वटल्याप्रकरणी अहिल्यानगर येथील १० वे अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी ए. जी. एम. शेख यांनी आरोपी ‘अफलातुन फोटो’चे प्रोप्रायटर संजोग पांडुरंग आडोळे (रा. सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) यांना दोषी ठरवून दोन महिन्यांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच फिर्यादी सी. टी. चिट्स कंपनी यांना २ लाख ३६ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार एक महिन्यात नुकसानभरपाईची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
प्रकरणातील माहितीनुसार, सी. टी. चिट्स प्रा. लि. शाखा अहमदनगर येथून मच्छिंद्रनाथ गायकवाड यांनी ५ लाख रुपयांची चिट (भिशी) रक्कम घेतली होती. हप्ते नियमित भरू, असा विश्वास दिल्यानंतरही त्यांनी हप्त्यांचा भरणा थकविला. या व्यवहारात ‘अफलातुन फोटो’चे प्रो. संजोग आडोळे हे जामीनदार होते. थकीत रकमेपोटी आडोळे यांनी युनियन बँक, शाखा सावेडी येथील त्यांच्या खात्यावरून १ लाख १८ हजार ७५० रुपयांचा धनादेश फिर्यादी कंपनीला दिला होता.
फिर्यादी कंपनीने हा चेक अॅक्सिस बँक, शाखा सावेडी येथे वटण्यासाठी सादर केला असता खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने चेक न वटता परत आला. त्यानंतर फिर्यादी संस्थेने आरोपीविरुद्ध कलम १३८ अन्वये न्यायालयात दावा दाखल केला होता. कागदोपत्री पुरावे व फिर्यादीकडून ऍड. प्रविण मुटकुळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.
या प्रकरणात फिर्यादी संस्थेकडून माहितगार इसम म्हणून अशोक तांबे यांनी काम पाहिले, तर कंपनीचे मॅनेजर विरेंद्रसिंग गैर यांनी सहकार्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS