Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पश्‍चिमेकडील पाणी गोदावरीत वळवून तूट भरून काढणार

दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बेलापूर :गोदावरी खोरे हे पाण्याच्या दृष्टीने तुटीचे खोरे असून, ही तूट भरून

सत्यमेव जयते’च्या सदस्यांचा ग्रामपंचायतकडून सत्कार
बेलापूरमध्ये प्रजासत्ताकदिनी दिव्यांगांचा सन्मान
त्यागामधून उभ्या केलेल्या कार्यकर्त्यांमुळेच देशात कमळ : डावरे 

दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
बेलापूर :गोदावरी खोरे हे पाण्याच्या दृष्टीने तुटीचे खोरे असून, ही तूट भरून काढण्यासाठी पश्‍चिमेकडून समुद्रात वाहून जाणारे सुमारे 55 हजार दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्याची महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित आहे. सुमारे 90 हजार कोटी रुपये खर्चाची ही योजना पूर्ण झाल्यास मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
बेलापूर ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व चौक सुशोभीकरण, घरकुल (रो-हाऊस) जागा वाटप, शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल वाटप यांचा समावेश होता. सुमारे 6 कोटी 12 लाख रुपये खर्चाच्या या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरद नवले होते. नामदार विखे पाटील म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामविकास, शेती आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे, असेही त्यांनी नमूद केले. गोदावरी खोर्‍यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रवरा व गोदावरी कालव्यांचे नुतनीकरण, लाभक्षेत्रातील सर्व चरांचे दुरुस्तीकरण करण्यात येणार आहे. तसेच वळदगाव कोरेगाव बंधार्‍याचे सुमारे 70 कोटी रुपये खर्चून उभ्या साठवण क्षमतेत (व्हर्टिकल बॅरेज) रूपांतर केले जाणार आहे. बेलापूर परिसरातील हरिहर केशव गोविंद घाट तसेच सय्यदबाबा दर्गा घाट सुशोभीकरणासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. घरकुल योजनेबाबत बोलताना नामदार विखे पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात 1 लाख 26 हजार घरकुले मंजूर करण्यात आली असून, बेलापूरसाठी 1,000 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 34 एकर जमीन मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. रस्त्यांची रुंदी किती असावी यापेक्षा प्रत्येक गरजूला घर मिळणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. अध्यक्षीय भाषणात शरद नवले यांनी बेलापूरला निवासी केंद्र (रेसिडेन्शियल हब) तसेच तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा मानस व्यक्त केला. 15 कोटी रुपये खर्चाच्या नदी संवर्धन प्रकल्पासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, व्यायामशाळा, स्पर्धा परीक्षा केंद्र, महिला बचत गट भवन व क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अभिषेक खंडागळे यांनी गेल्या पाच वर्षांतील विकासकामांचा आढावा घेतला. 126 कोटींची पाणीपुरवठा योजना, साठवण तलाव, घरकुलांसाठी मोफत जमीन, तसेच 1,000 घरकुलांना मंजुरी यासारखी महत्त्वाची कामे नामदार विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास विविध राजकीय, सामाजिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS